त्रिवेणी हा एक अनोखा काव्यप्रकार. चारोळ्या चार ओळींच्या तसे त्रिवेणी, हायकू तीन ओळींचे. त्यातही हायकूतल्या प्रत्येक ओळीतल्या अक्षरांच्या संख्येवर बंधन. कवीश्रेष्ठ गुलजारांच्या काही त्रिवेणींचा शांताबाई शेळक्यांनी केलेला अनुवाद आंतरजालावर वाचनात आला. 'साखळी हायकू' या आंतरजालीय खेळात सहभागी झालो होतो, तेव्हा त्रिवेणी जवळून पहायला व हाताळायला मिळाल्या. तेव्हा रचलेल्या काही त्रिवेणींची 'वेणी' येथे अर्पण करीत आहे.
*****************************
वाचून लोकसत्तेतल्या पुराच्या बातम्या
कोरडेटाक पडतात हल्ली डोळे
सरकार थोडंच कधी कुठे वाहून जातं?!
*****************************
जुन्या शर्टाच्या खिशात सापडली
रस्त्यावरची दोन-चार सुगंधी फुलं
माझ्या खांद्यावर डोकं ठेवून चालली होतीस कधी काळी
*****************************
ठाऊक होतं येईल पत्र तुझं फक्त आजच
त्यातल्या संवादानंतर चालू होणार माझं आत्मवृत्त
इतकी कशी ही शांतता बोलभांड?!
*****************************
कुरूप वेडं बदकपिलू एका तळ्यातलं
गुंगलंय राजहंस व्हायची वाट बघण्यात
पण शेवटी हिणवणारच सगळे 'अल्पसंख्यक' म्हणून!
*****************************