.......................................................
चांदण्यापलीकडून कोण...?
.......................................................
चांदण्यापलीकडून कोण हाक मारते मला?
मंद त्या निळेपणामधून कोण भारते मला?
का उगाचच्या उगाच मोह पाडते मला कुणी?
का निरोप सारखे तिथून धाडते मला कुणी?
मौन बाळगूनही कधी कुणी पुकारते मला!
जायला मिळेल का? असे कधीतरी घडेल का?
वाट त्या अनोळखी जगामधील सापडेल का?
रापलें उन्हात, काहिलीत...मन विचारते मला!
का मलाच एकट्यास आस लावली कुणीतरी...?
शुभ्र ती असेल की निळीच सावली कुणीतरी...?
जायचे समीप; मात्र कोण दूर सारते मला?
- प्रदीप कुलकर्णी
.......................................................
रचनाकाल ः ८ ऑक्टोबर २००८
.......................................................