आधीच माझे प्रेरणेशी वैर आहे
वाटे तिला की काव्य माझे स्वैर आहे
मी गुणगुणाया लागलो ही चूक झाली
हे पायरी सोडून बसणे गैर आहे
आक्षेप त्यांचा काय हे माहीत नाही
अन् स्पष्ट त्यांची सांगण्याची रीत नाही
ढुंकूनही सारस्वतांनी का बघावे?
त्यांच्या धुळीचा मी टिळा लावीत नाही
त्यांच्या गुरुंच्या थोरवीला मान देतो
इतरेजनांना ऐकण्या पण भीत नाही
हे वागणे पाखंड का पंथास वाटे
एकाच मूर्तीवर फुले वाहीत नाही
बा विठ्ठला, समजाव बडव्यांना तुझ्या की
घालून कुंपण धर्म विस्तारीत नाही
ते झापडे काढावया नसतात राजी
विश्वास माझा आंधळ्या भक्तीत नाही
दिसतो सडा जेथे गुणांचा, वेचतो मी
काट्या-फुलांचा भेद मग ठेवीत नाही
डोकावतो मी माणसांच्या अंतरीही
देवत्व देवाचेच गोंजारीत नाही
लढतोच आहे जन्मभर मी सावल्यांशी
आयुष्य सरले; हार नाही, जीत नाही...