'आजचा दिवस सुखाचा जावो! '

रोज सकाळी मी न चुकता फिरावयास जातो. का, माहित आहे? हां! स्वतःच्या आरोग्यासाठी, हे तर खरेच! पण त्या ही पेक्षा, किमान २५ जणांना तरी "आजचा दिवस सुखाचा जावो" हे वाक्य ऐकवण्यासाठी!

खरंच त्या सर्वांना दिवस सुखाचा जात असेल?  असेल ही कदाचित! पण असे त्यांना ऐकवल्याने माझा दिवस तरी सुखात जातो! कदाचित असे ही असेल की मी ज्यांना ज्यांना हे वाक्य ऐकवतो त्यापैकी अनेक जण " तुम्हाला देखील" असे प्रत्युत्तर देतात. त्या मुळे तर तसे घडत नसेल?

एवढे मात्र खरे की मी जेव्हा इतरांसाठी शुभचिंतन करतो तेव्हा सकारात्मक भाव चेतवतो. या सकारात्मक भावांची नुसती निर्मिती माझ्याकडून होत नाही, तर ते प्रवर्तित आणि परावर्तित देखील होत राहतात. मला माहित आहे की  केवळ शुभचिंतनाने शुभ घडत नसते. जे होणारे ते अटळ असते. प्रार्थना तेथे कुचकामाच्या ठरू शकतात. पण तरी ही हे सकारात्मक भाव जागवण्यातील स्वानंद मी घेत राहणारच!

ज्याला मी हे शुभचिंतन ऐकवतो, त्यापैकी फारच थोडे माझ्या प्रत्यक्ष पारिचयाचे असतील. अपरिचितात स्त्रिया असतात, पुरुष असतात, वृद्ध ही असतात अन तरुण ही! तरुणी देखील! सारेच विनासंकोच हसून दाद देतात.

न जाणो यामध्ये कुणी चोर ही असू शकेल! त्याला दिवस शुभ जायचा म्हणजे दुसऱ्या कुणाला तरी वाईट जायचा, नाही का! पण हे ही तितकेच खरे की मी उच्चारलेल्या शुभचिंतनाचा परिणाम म्हणून त्याची चौर्य वृती देखील संपायची! क्या पता?

आपले काम शुभ चिंतनाचे! परिणामांचा इतका विचार कशास करत बसायचे?