जन्म आयता आहे

लाचारपणाचा कणा वाकता आहे
मी पराजयाचा 'पाय काढता' आहे

ही उगाच वाढे मना तुझ्याशी चर्चा
आपला तसा संबंध कोणता आहे?

बघ कविता इथेच आहे, घोळ निराळा!
जो शोधत आहे तोच लापता आहे

हा पूल करावा पार, मला भेटावे
पण मोहनदीचा जोर वाढता आहे

या अस्तित्वाला नाव कशाचे द्यावे?
'म्हातारपणीचा हात कापता आहे'

मृत्यूच्या पेढीवर बिचकत जाणारा
मी सजीवतेचा 'हात मारता' आहे

हा प्रस्थापित, चल सुरुंग लावू याला
मोठ्या लोकांचा भ्रष्ट आडता आहे

अर्थांच्या वस्तीमध्ये शब्द भिकारी
की तृतीयपंथी हात वाजता आहे?

हा कसा बोलतो त्यावर ठरते सारे
हा काय बोलतो, काय आर्तता आहे?

कर सिद्ध कधी मी मागितला होता हा?
कर कबूल आता, जन्म आयता आहे

हा येणारा क्षण माझी आणि स्वतःची
का नको तरीही करत सांगता आहे?