चार मायेचे उत्साहाचे शब्द निराश मनाला शांत करण्यास उपयोगी पडतातच. उभारीची ताकद तर पंखात असतेच. जाणिव फक्त परत व्हावी लागते.
अजुनी उदास का रे बोलावयास काही?
की घातलेस पुन्हा ओठांस बांध काही?
नेहमीच सुर्य दिसतो अस्ताचलास तुजला..
चैतन्य जागवाया, उदयात शोध काही!
पेटावयास वणवा क्षणमात्रही पुरेसा..
फुलवावयास माती सरतात जन्म काही!
घे कुंचला मनाचा रेखावयास जगणे
रंगांत डुंबणारे उरले अजून काही!
ध्येयास गाठण्याचा घे छंद अंतरी तू!
भात्यात निश्चयाच्या, आहेत बाण काही!
प्रेमात ईश्वराचे अस्तित्व जागताहे..
स्मरणात राघवाच्या उधळून टाक काही!!
शुभम