"काय राजा, कुठं ? "
मागून आवाज आला तसा मी समजलो राजाच असणार. मागून एक मारुती ओमनी घेउन राजा आला.
"का रे तु कुठ ? "
"काय राजा, हे नेहमीचच. मगनशेठची फॅमिली सोडून आलो देवळात... नमस्कार वैनी" माझ्या सौ. कडे पाहत म्हणाला.
"बाकी नवीन काय ? "
"चल सोडतो तुला, नंतर डॉक्टर सापळेला घेउन जातो दवाखान्यात"
त्याने मला पोलिस स्टेशनजवळ सोडलं अन त्याचा पिच्छा सुटला तर बायकोचा पट्टा सुरू झाला.
"कोण होता हो ? "
"हा ? राजा "
"आणि डॉक्टरच नाव सापळे आहे म्हणजे मजाच आहे"
"नाही ग बाई, आमचा एक मित्र आहे, तो इतका बारीक आहे की सगळे त्याला डॉक्टर सापळे म्हणतात. "
"अस्स, पण तुम्ही मला या मित्राबद्दल काहिच सांगितल नाही"
राजाबद्दल ? काय सांगावं हा मी विचारच करत बसलो, कारण त्याच्याबद्दल सांगण्याबद्दल खुप काही होतं. त्याच नावसुद्धा त्यात एक. राजाच खरं नाव काय आहे हे त्यालाही आठवत नसेल. तो नेहमी बोलताना, "काय राजा... " अशी सुरुवात करायचा म्हणून त्याचं नाव राजा पडलं. बाकी नाव ठेवण्यात तो पटाईत.
"त्यानी मला लगेच ओळखलं, नाही ?" सौ. म्हणाली, तसा मी दचकलो.
कॉलेजमध्ये सोबत पोरगी असली की त्याची नजर पोरीकडे कमी अन राजा कुठे दिसतो का हे बघायची. कुठून भसकन येउन "नमस्कार वैनी" म्हणेल याचा भरोसा नसायचा. ३-४ आमचेच मित्र पोरिचा मार खाता खाता वाचले. त्यात मी एक होतो हे सौ. ला थोडिच सांगणार. त्यावेळी वाचलो, आता थोडिच वाचणार होतो.
बाकी पोरींशी बोलावं तर राजानेच. एकदा आमची सहल ठरली होती. पण मुली यायला तयार नव्हत्या. मग काय मुली नाही तर सहलीला मजाच नाही. मग आम्ही सगळ्यांनी राजाचे पाय धरले. तो फक्त दोनच मुलींकडे गेला अन अख्खा वर्ग सहलीला तयार. आम्ही परेशान. राजाने केलं तरी काय ?
सहलीवरून आल्यावर सांगितलं. मी दोन मुली बघितल्या ज्यांचं एकमेकीशी अजिबात पटत नाही. प्रत्येकीला सांगितलं "तू येवून पोरींचा ग्रुप बनवू नये म्हणून ती येणार नाही असं सांगत आहे. ती येणार अन तु सोडून बाकी सगळ्यांना तिच्याकडे ओढणार. तु बस बोंबलत. "
बस्स मग काय ? दोघिंनी निवडणुकीसारखा प्रचार केला अन अख्खा क्लास ट्रिपला.
(क्रमश :)