कोमल गंधार (भाग - २)

पंधरा-वीस मिनिटांची जंगलातून सरळ वर चढत गेलेली पाऊलवाट चढून गेल्यावर समोरच्या थोड्या सपाटीवर फॉरेस्टचा डाक - बंगला होता. हिरव्या गर्द जंगलातला एक छोटासा चौकोनी तुकडा काढून त्या जागी बसवल्यासारखा.  डाक बंगल्याचं पहिलंच दर्शन अगदी लोभसवाणं होतं. लाल मंगलोरी कौलांचं छप्पर, दगडी भिंती, त्यात पांढऱ्या चौकटींमध्ये बसवलेल्या काचेच्या खिडक्या, बंगल्याची मागची बाजू सोडून उरलेल्या तीनही बाजूंनी असलेला प्रशस्त व्हरांडा, त्याचा सुंदर नक्षीकाम केलेला लोखंडी कठडा, अन कठड्याच्या सरळ रेषेत वरती उतरत आलेलं कौलारू छप्पर.  आणि या सगळ्यापेक्षाही मोठ्ठं आकर्षक दिसत होती ती बंगल्याच्या समोरची हिरवळ लावलेली सपाट मोकळी जागा. बसायला, पाय मोकळे करायला आणि गप्पा मारायला. अन या मोकळ्या जागेच्या सभोवार सीमेलगत रांगेनं लावलेली सिल्व्हर ओकची उंच उंच झाडं...  

बंगल्याच्या खानसाम्यानं लाँचचा आवाज ऐकला होता. चैतन्य आणि प्रज्ञाला तो गेटपाशीच सामोरा गेला.  "काय रामभाऊ?  काय म्हणताय? " चैतन्यनं चौकशी केली.  

"नमस्कार साहेब. "

"नमस्कार.  काय म्हणताय? कसं काय चाललंय? "

"चाललंय आपलं साहेब.  सरकारची नोकरी त्यामुळे सगळं चांगलच आहे बघा. बरं या या. आत या. मी दोन्ही खोल्या तयारच करून ठेवल्यात. "  

"रामभाऊ, यांचं नाव प्रज्ञा शर्मा.  या पर्यावरण शास्त्रातल्या मोठ्या अभ्यासक आहेत बरं का.  इथल्या फुलपाखरांवर संशोधन करायला आल्या आहेत. "

"नमस्कार मॅडम. " रामभाऊ.   

"बरं रामभाऊ जेवणाचं मी थोड्या वेळात सांगतो तुम्हाला चालेल ना? "

"चैतन्य आपण आज जरा लवकरच जेवून घेऊ या का? मी अगदी दमून गेलीये प्रवासानं.  लवकर जेवू आणि लवकर झोपून टाकू आजच्या दिवस. चालेल ना? " प्रज्ञानं विचारलं.   

"हो चालेल की. तू फ्रेश वगैरे हो.  आठच्या सुमारासच जेवू. " 

रामभाऊ तिथेच उभे होते. त्यांच्या सारं लक्षात आलं. " ठीक आहे साहेब. तुम्ही दोघं फ्रेश व्हा.  मी स्वयंपाकाचं बघतो आणि आठच्या सुमारास पानं घेऊन हाका मारतो की... "

फॉरेस्टचा हा डाक बंगला जेवढा सुंदर होता तेवढ्याच त्यातल्या खोल्या पण चांगल्या होत्या.  स्वच्छ, प्रशस्त, भरपूर उजेडाच्या.    प्रत्येक खोलीत मोठा पलंग, त्यावर स्वच्छ धुतलेल्या चादरी घातलेल्या.  संडास, बाथरूम आतच आणि असेच स्वच्छ, पाण्याची चांगली सोय असलेले. अगदी मोठे मोठे सरकारी अधिकारी इथे येऊन रहायचे.  त्यामुळे या बंगल्याचा बडेजाव काही वेगळाच होता.  रामभाऊ इथला गडी, रूमबॉय, खानसामा, मॅनेजर, केअर टेकर सारं काही होता.  बंगल्याच्या आवारातच मागच्या बाजूला त्याची खोली होती.  त्याच्या कुटुंबात तो आणि त्याची बायको दोघंच होती.  मोठा मुलगा पुण्यात नोकरी करायचा आणि धाकट्या मुलीचं लग्न होऊन ती सासरी गेली होती.  दिवसभर रामभाऊ अन त्याची बायको बंगल्याची झाडलोट, आलेल्या पाहुण्यांची देखभाल, स्वयंपाक पाणी, आवरणं वगैरे सारं काही भक्तीभावानं करायचे.  बागेचं, झाडांचं काम आणि बंगल्याची देखभाल दुरुस्ती अशा कामांसाठी बाहेरचे मजूर बोलावले जायचे.   

जेवणाच्या टेबलावर अगदी खमंग वास सुटला होता. मोठा डायनिंग हॉल.  त्यात तसंच मोठ्ठं डायनिंग टेबल. कांद्या बटाट्याचा रस्सा, पोळ्या, आमटी, लसणाची चटणी, कांदे असा साधाच पण रुचकर बेत होता.   

"बरं आता उद्यापासूनचा तुझा प्रोग्रॅम कसा कसा आहे? " चैतन्यनं जेवायला सुरवात करता करताच विचारलं.   

"हे बघ या भागातल्या फुलपाखरांच्या काही खास जाती आहेत.    ही फुलपाखरं फक्त इथेच आणि याच दिवसात दिसतात.    यांची लाईफ सायकल अगदी लहानशीच असते आणि ह्युमन हॅबिटॅटच्या आसपासही ही फुलपाखरं येत नाहीत.    सहाजिकच त्यांच्या बद्दल खूपच कमी माहिती मिळते.    मला त्यांच्यावर थोडसं काम करायचंय.    माझ्या माहितीप्रमाणे आणि संध्याकाळी येताना या जंगलाचं जे पहिलं दर्शन झालंय त्यावरून माझी खात्री आहे की इथं हजारोनी त्यांची वस्ती असेल. " प्रज्ञानं एका दमात सगळं सांगून टाकलं. 

"मॅडम फुलपाखरांवरच्या या पहिल्या धड्याबद्दल धन्यवाद! पण मला असं विचारायचं होतं की या सगळ्यासाठी तुला जंगलात भटकंती करावी लागेल का? आणि किती वेळ? तू साधारण काय ठरवलंयस ते कळलं की थोडसं आपल्याला उद्या परवाचं प्लानिंग करता येईल. कळलं? " चैतन्य

"कळलं.  हे बघ, मी असा विचार करतीये उद्या आणि परवा सकाळी लवकरच उठून जंगलात जायचं.  आणि जेवणाच्या वेळेपर्यंत म्हणजे चांगले पाच सहा तास भटकंती करायची, निरिक्षणं करायची, सँपल्स गोळा करायची, फोटो काढायचे वगैरे वगैरे.  आणि दुपारी जेवणानंतर इथे बसून नोटस काढायच्या, नोंदी करायच्या, कदाचित काही संदर्भ वाचायला लागतील ते वाचायचे वगैरे वगैरे.   तू येणार का माझ्या बरोबर भटकायला? "

"मला तर यायला आवडेल तुझ्याबरोबर.  पण एकेका फुलपाखराच्या मागोमाग तू तास तास हिंडणार. परत बोलायचं नाही, आवाज करायचा नाही  अशा तुझ्या अटी असणार.  नाही का? "

"अर्थातच... " प्रज्ञा हसत हसत म्हणाली.  

"मग तू जंगलात तुझी भटकंती कर.  मी इथेच थांबून मला बरंच लिखाण करायचंय ते करतो.  संध्याकाळी मात्र आपण मस्त गप्पा मारू.  कसं काय? "

"शहाण्या अरे चल की जंगलात भटकायला. मी काही फार अटी घालणार नाही.  भटकता भटकताही गप्पा मारू आणि पुन्हा संध्याकाळीही आहेच की. "

"बरं एक काम करूया.  उद्याच्या दिवस तू एकटीच जा.  माझ्या डोक्यात काही एक विशिष्ट विषय तयार आहे आणि ते लिहायला हात अगदी शिवशिवतायत. ते सगळं एकदा कागदावर उतरवलं की मला अगदी बाळंत झाल्यासारखं वाटेल.  त्यामुळे उद्या सकाळी आणि दुपारी बसून मी जास्तीत जास्त खर्डेघाशी करतो आणि परवा मग तुझ्याबरोबर भटकायला येतो. "

"बरं तर.  मग तू उद्या तुझ्या बाळंतपणाला जा आणि मी सकाळीच जंगलात जाते.  संध्याकाळी मात्र पाच साडेपाच पर्यंत सगळं तुझं काम आटप. म्हणजे मग आपण टाईम पास करायला मोकळे.  ओके? "

"ओ यस्स. " चैतन्यनं दुजोरा दिला.   

सकाळी हवेत मस्त गारठा पडला होता आणि सगळा आसमंत धुक्यात अक्षरशः गुरफटला गेला होता.  अगदी पहाटे पहाटेच सगळं आवरून प्रज्ञानं तिची जंगलात जायची तयारी केली.   रामभाऊंनी बंगल्यावर कामावर असणाऱ्या मजुरांमधल्या एका बाईला मुद्दाम प्रज्ञाच्या बरोबर दिलं. "मॅडम इथं तशी खरं तर काही भीती नसते.  पण हा कोअर एरिया आहे. शिवाय पावसाळ्यामुळे रानपण फार गच्च वाढलंय.  एकीला एक तुम्ही दोघी असलात म्हणजे आम्हाला काही काळजी नाही. आणि शिवाय या बाईला जंगलाची चांगली माहिती आहे त्यामुळे तुम्हाला जरा मदतच होईल. " रामभाऊंनी माहिती पुरवली.

"प्रज्ञा तुझा सीडी प्लेअर माझ्यासाठी देऊन जा. म्हणजे लिहिता लिहिता एकीकडे चांगली श्रवण भक्तीही करतो.  रामभाऊ, बाहेर व्हरांड्यात मला लिहिण्यासाठी एक टेबल खुर्ची टाकून द्या ना. " चैतन्य.

थोड्याच वेळात प्रज्ञा तिच्या बरोबरच्या बाईला घेऊन निघून गेली.  रामभाऊंनी चैतन्यसाठी बाहेर टेबल खुर्ची टाकली होती.    चैतन्यनं बाहेर व्हरांड्यातच सीडी प्लेअर लावला आणि टेबलावर कागद, पेन, संदर्भाची पुस्तकं अशी सारी जय्यत तयारी केली.    स्वच्छ पांढरा सुती सदरा अन लेंगा घालून त्यानं त्याची लिखाणाची बैठक जमवली.   

सृष्टिचा, निसर्गाचा माणसाच्या मनावर खोल परिणाम होतो.    शुद्ध, स्वच्छ, मोकळी हवा, सभोवताली पसरलेली गर्द झाडी, विविध पक्षांचं कूजन, त्यांची इकडून तिकडे चाललेली लगबग, मनमोहक फुलपाखरांचा मुक्त विहार, पाऊस पिऊन तृप्त झालेली माती, वृद्ध होऊन गळून गेलेला पाचोळा,   उंच उंच सिल्वर ओक्सच्या पानांमधून उतरलेले सूर्य किरण... या प्रत्येक सृष्टी घटकाचा स्वतंत्रपणे आणि या साऱ्या घटकांचा एकत्रितपणे माणसाच्या चित्तवृत्तींवर आणि भाव विश्वावर थेट आणि सखोल परिणाम होतो.   आणि या परिणामाचं प्रतिबिंबच चैतन्यच्या लिखाणात उतरत होतं.  

दुपारी दीडच्या सुमारास प्रज्ञा थकून भागून जेव्हा परत आली तेव्हा चैतन्य संपूर्ण एकाग्र चित्तानं खाली मान घालून लिहित होता.   मागे कुमारांची वृंदावनी सारंगातली बंदीश.   चैतन्यच्या समोर एक खुर्ची ओढून धाडकन प्रज्ञा जेव्हा बसली तेव्हाच चैतन्यची तंद्री मोडली.

"बापरे, चैत्या... एवढं भटकलोय, एवढं भटकलोय काय सांगू तुला. मला अगदी कडकडून भूक लागलीये. आणि प्रचंड काम केलंय मी आज. तुला नंतर सगळ्या गंमती जंमती सांगते.   आधी जेवण... "

"अगं स्वयंपाक तयार आहे. रामभाऊ मगाशीच विचारत होते.  काय मस्त लालबुंद दिसतीयेस तू.  तू जरा वॉश वगैरे घेऊन ये.   मला पण भूक लागलीये. मी रामभाऊंना पानं लावायला सांगतो. "

जेवण झाल्या नंतर प्रज्ञानंही तिच्या खोलीतलं टेबल खुर्ची व्हरांड्यात चैतन्यच्या टेबलाजवळ आणवून घेतलं आणि पुन्हा एकदा ते दोघंही आपापल्या कामांमध्ये बुडून गेले.

"बापरे लिहून लिहून मान मोडून आली. तुला अजून किती अवकाश आहे?" चैतन्यनं आळस देत विचारलं. संध्याकाळचे सहा साडेसहा झाले होते.   उन्हं कधीच उतरून गेली होती.  

"मलाही आता कंटाळा आलाय रे.   पण आज इतकं मस्त काम झालंय म्हणून सांगते.   भरपूर निरीक्षणं केलीत मी.   सगळीच्या सगळी आता लिहून काढलीयेत. निंफॅलिडे नावाच्या फॅमिलीतल्या बटरफ्लाईजवर मला निरीक्षणं करायची होती.   ही अगदी सुंदर, मोठी आकर्षक रंगांची फुलपाखरं असतात.   आणि त्यांच्या शेकडो जाती - प्रजाती आहेत.   यांच्यातल्या डॅनायने या प्रजातीत मला विशेष रस. आणि आजच्या माझ्या भटकंतीत तर मला अक्षरशः हजारोंनी ही दिसली. ग्लासी टायगर्स, ब्लू ग्लासी टायगर्स, ट्री निंफस, मॅगपाय क्रो, मलाबार ट्री निंफ... किती प्रकार म्हणून सांगू.  आणि या सर्वांवर कळस चढला तो म्हणजे ब्लू मॉर्फोच्या दर्शनानं.. " प्रज्ञा उत्साहानं सांगत होती.

"ब्लू मॉर्फो म्हणजे? " चैतन्य.

"अरे ब्लू मॉर्फो नावाचं अस्सं मोठ्ठं सात आठ इंची स्पॅन असलेलं, गर्द रेशमी निळं फुलपाखरू दिसणं म्हणजे आयुष्य सार्थकी लागल्यासारखं आहे, इतकं ते सुंदर असतं.  आणि हाईट म्हणजे माझ्या वाचनात तरी ते पश्चिम घाटात कधी स्पॉट झाल्याचं मी वाचलं नाहीये.   ते इथं आहे हे कळलं तर आमच्या फुलपाखरं प्रेमी जमातीला धक्काच बसेल आणि माझ्यासाठीही मोठी अचिव्हमेंट असेल.   मी त्याचे खूप फोटो काढलेत. तुला दाखवीन मी. " प्रज्ञाचा उत्साह ओसंडून वाहत होता.  

"अरे वा! हे तर फारच छान झालं.   म्हणजे पी एच डी मिळाली की मला एक जोरदार पार्टी नक्की तर. छान छान. माझंही भरपूर काम झालं आज. अगदी मस्त मोकळं मोकळं वाटतंय आता बाळंतपण होऊन गेल्यामुळे... " आणि दोघेही त्यावर खळखळून हसले. "ठीक.  हे बघ हे सारं आता आवरू. मी जरा फ्रेश होतो. रामभाऊंना मी आपल्यासाठी बाहेरच्या हिरवळीवर टेबल खुर्च्या लावायला सांगितल्यायत.  तू पण आवरून फ्रेश होऊन ये. आणि मी तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज पण आणलंय... "

"हो का? मग तर मी अगदी पटकनच येते हां. "

तासाभरात आंघोळ वगैरे करून कपडे बदलून दोघेही बाहेर आले.   बाहेर अंधार नुकताच पडला होता.   रामभाऊंनी हिरवळीवर दोघांसाठी एक टेबल त्यावर स्वच्छ आच्छादन आणि दोन वेताच्या खुर्च्या टाकल्या होत्या.   टेबलाच्या मध्यभागी चंबूच्या आकाराची उंच काच असलेला दिवा ठेवला होता आणि त्यात मेणबत्ती पण लावली होती.   आकाशात चांदणं टिपूर होतं.   आज चतुर्दशी होती अन उद्या पौर्णिमा.   चंद्र अजून वर यायचा होता.   समोरचा डोंगर काळाकभिन्न दिसत होता.   रातकिड्यांनी आसमंतभर एकसूर लावला होता.  थंडीनं कणाकणानं शिरकाव करायला सुरवात केली होती.  

"अहाहा चैत्या काय महौल आहे रे... काहीतरी चांगली सीडी लाव की. "

"हो.  लावतो ना. माझ्याकडे हरिप्रसादजींची एका खाजगी मैफिलीची सीडी आहे. त्यात पूर्ण विस्तार केलेले पूरिया, बागेश्री अन चंद्रकंस आहेत.  ओळीनी एका मागोमाग एक. थांब लावतो मजा येईल. "

सीडी लावून चैतन्यनं खोलीतून एक छोटीशी लाकडी पेटी बाहेर आणली. "आणि हे खास माझ्या जीवश्च कंठश्च मैत्रिणीसाठी... " चैतन्यनं ती पेटी प्रज्ञाच्या हातात दिली.  

प्रज्ञानं त्याच्यावरचं लेबल वाचलं "शॅटॉ मौंटाँ रॉथशिल्ड... वॉव... चैतन्य, फ्रेंच वाईन?... वंडरफूल... "

"अगं ही नुसती साधी सुधी फ्रेंच वाईन नाहीये. हिची सोनेरी लाल कांती आणि हिची गोड, फळांचा स्वाद असलेली चव... ही फक्त जीवलग मैत्रिणीसाठीच खास बनवलेली आहे, फ्रांसमध्ये. फ्रांसच्या बोर्ड्यू भागात.  आणि बोर्ड्यूमध्येच जगातल्या सर्वोत्तम वाईन्स बनतात हे तुला माहिती आहे ना?".   चैतन्यनं माहिती पुरवली " आणि दुसरं म्हणजे हिला रोमान्स वाईन पण म्हणतात... ".

"अरे वा... मग तर घेऊन बघितलीच पाहिजे पटकन... ".

"हं.  आणि ही जिभेवर विरघळून हलकेच घशाखाली उतरते ना तसतशी अगदी रोम रोमात भिनत जाते बघ. "

"चैत्या आता मग उघड की पटकन... " प्रज्ञा उत्साहात येऊन म्हणाली.   "हो हो उघडतो ना. " चैतन्यनं बॉक्स उघडून त्याच्या आतून ती सुंदर उंच काळ्या रंगाची श्रीमंती बाटली टेबलावर ठेवली.  

"चीअर्स... " प्रज्ञानं ग्लास उंच करून म्हटलं

"चीअर्स... स्ट्रेट फ्रॉम माय ब्यूटीफूल लेडीज शू... आपल्या सुंदर अढळ मैत्रीसाठी... " चैतन्यनं त्याचाही ग्लास उंचावत म्हटलं.  

प्रज्ञानं हलकेच एक घोट घेतला "ओहोहो... काय चव आहे रे... "

"मग... हां आणखी एक सांगायचं राहिलं... ही वाईन प्यायल्यावर रोमान्स करावा लागतो, म्हणून तर याला रोमान्स वाईन म्हणतात". चैतन्य हसत हसत मस्करीच्या स्वरात म्हणाला.

"चूप.   शहाणपणा करू नकोस.   पण मला ही वाईन फारच आवडली. " मागे बासरीवर हरिप्रसादजींचा पूरिया बहरात आला होता.  

चैतन्य आणि प्रज्ञाच्या गप्पांना खंड नव्हता. साऱ्या जुन्या आठवणी निघाल्या. प्रत्येक मित्राचा, मैत्रिणीचा संदर्भ निघाला. त्या काळात केलेली वेडेपणं आठवली.  हसून हसून मुरकुंडी वळाली.  

"तुला आठवतंय प्रज्ञा, एकदा एका वक्तृत्व स्पर्धेत मला प्रदूषणावर बोलायचं होतं आणि तयारी काहीच झालेली नव्हती... "

"कधी रे? मला नाही आठवत आहे... "

"आणि तू मला कँटीन मध्ये विचारलंस काय रे तयारी झाली का?   आणि मी नाही म्हटल्यावर मला यथेच्छ झापडलंस आणि मग प्रेमानं भराभर पॉईंटस लिहून दिलेस... आठवतं? आणि जा हे पॉईंटस आहेत यावर आता बोल असा दमही दिलास.  आठवलं का? " चैतन्य.

"हो हो आणि गधड्या मी प्लांटस प्रोड्यूसिंग इलेक्ट्रिसीटी असा एक पॉईंट इंग्रजीत लिहिला होता तर तू स्टेजवर उभा राहून आफ्रिकेत काही झाडं वीज तयार करतात आणि त्यांच्यामुळे खूप प्रदूषण होतं असे अकलेचे तारे तोडले होतेस!... मला चांगलं आठवतंय... "

"हाः हाः हाः, हो हो.  पण हे बघ,  तिथे कुणाला काही कळलं का?  तूच एकटी कोपऱ्यात बसून मला 'बाहेर ये मग दाखवते' असा खुणेनं दम भरत होतीस".

"हेः हेः हेः, मग काय तर. हाणणारच होते मी तुला... "

"हं.  आणि हाईट म्हणजे त्या स्पर्धेत मला बक्षिस पण मिळालं. " दोघेही यावर मनमुराद हसले.  अशा एक ना अनंत आठवणी निघाल्या.  

रात्र चांगलीच वर आली होती. हवेत गारठा पसरला होता. या दोघांच्या गप्पांशिवाय बाकी सारा आसमंत निः स्तब्ध झोपला होता.  

"प्रज्ञा पण एवढे चढ उतार झाले, एवढे मित्र मैत्रिणी आले गेले पण फक्त आपल्या दोघांची मैत्री मात्र एखाद्या निर्मळ नदीसारखी अखंड वाहत राहिली नाही? "

"हो रे.  आय फील सो प्राऊड चैतन्य... किती वर्षं झाली असतील रे आपल्या मैत्रीला? " प्रद्यानं चैतन्यच्या डोळ्यात खोल बघत विचारलं.

"अं... वीस... छे... अकरावीत आपण रेड क्रॉसमध्ये होतो म्हणजे... अं... जवळ जवळ पंचवीस वर्षं... " चैतन्य.

"बापरे... वॉव... तुला हे विशेष नाही वाटत? " प्रज्ञा. 

"ऑफ कोर्स हे अगदी विशेषच आहे.  आणि म्हणजे तू स्त्री, मी पुरुष असं असूनही आणि तुझं पारंपारिक पद्धतीनं लग्न, संसार वगैरे झालं तरीही... तरीही आपलं हे नातं असंच दृढ टिकून आहे हे नक्कीच अतुलनीय आहे.  आणि खरं सांगू याचं बरचसं श्रेय तुझ्याकडेच जातं... कारण दुसऱ्या कुठच्याही मुलीनं विशेषतः तिच्या लग्नानंतर अशा दोस्तीला सरळ रामराम ठोकला असता... "

"चैतन्य असं का म्हणतोयस?  आपल्या दोघांनीही ही दोस्ती टिकवली... याचं श्रेय आपल्या दोघांकडेही जातं... हो की नाही?" 

रामभाऊंनी फक्त चैतन्य आणि प्रज्ञाच्या खोलीबाहेरचे व्हरांड्यातले दिवे चालू ठेवले होते. आणि बाकी बंगल्याच्या आवारातलेसगळे दिवे मालवून टाकले होते.  टेबलावर ठेवलेली चिमणीही केव्हाच संपून गेली होती.  पूर्वेकडच्या डोंगरामागून चंद्र आता चांगलाच वर आला होता.  चैतन्य, प्रज्ञा, ती हिरवळ, त्या पलिकडचे सिल्व्हर ओक आणि बंगल्याचा साराच परिसर त्या जवळ जवळ पूर्ण चंद्राच्या प्रकाशात न्हाऊन निघत होता.  वरचा काळाभोर आकाशमंडप लाखो चमचमत्या तारकांनी पूर्ण व्यापून गेला होता.  सीडीवरचा हरिप्रसादजींचा पूरिया, बागेश्री आणि चंद्रकौंस सारं काही वाजवून पूर्ण बहरात येऊन ओसरून गेले होते.  संपूर्ण आसमंत बासरीच्या अन तबल्याच्या त्या नाद ब्रम्हात, त्या आरोहा अवरोहांत चिंब भिजून आता शांत नीरव झाला होता.  थंडी उबदार झाली होती. चैतन्यनं आपली खुर्ची प्रज्ञाच्या शेजारी सरकवून तो तिच्या अगदी जवळ जाऊन बसला.  

"प्रज्ञा... खरं सांगू... " चैतन्यनं हलकेच प्रज्ञाचा हात आपल्या हातात घेतला "मला तू अगदी पहिल्या दिवसापासून खूप खूप आवडतेस.  एक व्यक्ती म्हणून... साधी, सरळ, डाऊन टू अर्थ... एखाद्या स्वच्छ, सुंदर, खळाळत्या झऱ्यासारखी प्रसन्न आहेस तू... आणि अशी तू माझी अगदी जीवलग सखी आहेस... हे... मी माझं भाग्यच समजतो... " कोमल आवाजात चैतन्य मन मोकळं करत होता अन प्रज्ञाचा हात त्यानं बोटात बोटं गुंतवून हातात धरला होता. 

"हं... " मंद स्मित करत अन डोळे मिटून घेत प्रज्ञानं हुंकार दिला.  काही क्षण परत शांततेत गेले.  

"प्रज्ञा, रबिंद्रनाथ टागोरांची एक कविता आहे ... 'तुमी राबे'... बंगालीत आहे... तिचा अर्थ आहे या रात्रीच्या अंधारात चंद्राचा प्रकाश जसा संपूर्ण पण अगदी नकळत, अव्यक्त सामावून गेलाय तशीच माझ्या हृदयात तूही अगदी संपूर्ण, अगदी नकळत, अगदी अव्यक्त अशी सामावून गेलीयेस... " चैतन्यनं अलगद प्रज्ञाच्या हाताचं चुंबन घेतलं.

"चैतन्य किती छान बोलतोयस रे... असाच बोलत राहा ना ... मला खूप खूप छान वाटतंय... " प्रज्ञाच्या डोळ्यातून जिव्हाळा ओसंडून वाहत होता.

"माझी दुःखं, माझ्या वेदना, माझी स्वप्नं, माझा आनंद सारं काही तुझ्या समोर आहे... आणि तू हळूवारपणे सुगंघासारखी पसरलीयेस माझ्या अवती भोवती... मला पूर्ण गुरफटून टाकलंयस... रात्रीत सामावून गेलेया चंद्रप्रकाशासारखी तू संपूर्ण अव्यक्त माझ्या हृदयात सामावून गेलीयेस..." 

प्रज्ञाचं मन उचंबळून येत होतं.  डोळे मिटून घेऊन चैतन्यचे दोन्ही हात तिनं आपल्या हातांनी हृदयाजवळ धरले होते.  "चै.. तन्य... " प्रज्ञा कसंबसं कुजबुजत म्हणाली अन चैतन्यनं हलकेच आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले ... आवेगानं प्रज्ञा चैतन्यच्या मिठीत शिरली... हाताच्या ओंजळीत प्रज्ञाचा गोल आकर्षक चेहेरा घेऊन चैतन्यनं तिची अनंत चुंबनं घेतली... प्रज्ञाला स्वतःला आवरणं अशक्य जात होतं... उधाणासारख्या भरभरून येणाऱ्या प्रेमानं चैतन्यला ती अधिकाधिक समर्पित होत गेली.  दोन्ही शरीरं प्रणय - हिंदोळ्यांवर आरुढ झाली... एकमेकांमध्ये विलीन होत गेली...

- क्रमश: