मनीं उमलता तुझी आठवण
सहजच सारी रात्र सरावी,
हुरहुरणारी जलराणीही
डोळ्यांवाटे झरून जावी।
पण तेव्हाही अश्रूंनी त्या
दवबिंदूंचे लेणे ल्यावे,
जडावलेल्या डोळ्यांमधुनी
अर्धोन्मीलित स्वप्न फुलावे।
खुणावणारी हिरवी किणकिण
लाजत लाजत हळु थबकावी,
निवांत झाल्या ओठांनी मग
स्मितहास्याची लकेर घ्यावी।
कधी मनाच्या हिंदोळ्यावर
नकळत निद्रा निश्वासावी,
ओढ विलक्षण अशी वाटुनी
संथपणाने झुलत रहावी।
नीरवतेच्या तालावरती
गीत प्रभेने सुरात गावे,
धुके लपेटुनि आठवणींचे
उबेत त्याच्या गुंतुनि जावे।
---भल्या पहाटे ज्योती उधळित
तव हास्याचे मोती यावे,
त्या हास्यातच; लपेटलेले
आठवणींचे धुके विरावे!
-मुग्धा रिसबूड
रचनाकाल : २३/०८/१९९८.