तुझ्या-माझ्यातले........

ते वागणे साधेसुधे, ते बोलणे गोडातले
तू सांग ना गेले कुठे ते आपल्या दोघातले?

हे साठल्या पैशातुनी मी आणले होते तुला
हे शोभण्याचे थांबलेले लाडके कानातले!

का आज त्यांना सांगते आहेस तक्रारी तुझ्या?
तू, मी उभे होतो कधी मिटवायला ज्यांच्यातले

आता तुला मी चालतो आहे, जसा आहे तसा
हे मी सुधरणे की तुझे खालावणे दर्जातले?

तू वागते आहेस त्याला नाव नाही एकही
तेही जसे होते तसे हेही तुझ्या-माझ्यातले