तुझेच आभाळ...

तुझा छंद लागो, तुझा नाद लागो.
विठ्ठला मला रे, वेड तुझेच लागो,

मला न उरले देणंघेणं, आता या जगाशी,
तुझ्याशीच घेणं आता, तुझेच देणं लागो.

मला न रास आली, ही सुख: तुझ्यावाचूनी,
तुझी ठेच, तुझीच वेदना माझ्या उरात नांदो.

जन्म-मरण बिंदूतूनी, विटली देहदिंडी माझी
हा शेवटचा मुक्काम आता, तुझ्याच चरणी थांबो.

तडफडे इथे माझा, निष्पाप प्राण देहांती,
तृषणेच्या मृगजळाला, तुझेच क्षितिज लाभो.

मी तुला न पुसले, आपले नाते माय माऊली गे,
मित्र, सखा तू माझा, काय ते? तुझे तुच जाणो.

एवढा हट्ट लेकराचा, पुरव मायमाऊली गे,
तुझ्या दिंडीची पायधूळ, माझ्या माथी लाहो.

किनारे, वारे, तारे, या सार्‍यात तू विठ्ठला
जिवांतूनी, दर्‍याखोर्‍यातूनी तुझा संग लाभो

वंचना तिच ती, तोच प्रंपच अन तेच वर्मी घाव,
सारे घायाळ पाखरू, सर्वांस तुझेच आभाळ लाभो.

******************************