या मनावरी उगाच भार कोण मागते?
जन्म ईश्वरा तुझा उधार कोण मागते?
आजही तुझा अभाव व्यस्त ठेवतो मला
रोजगार चालतो, पगार कोण मागते?
भिन्न भिन्न विभ्रमांत गोंधळून चाललो
साफ़ दे नकार, हे प्रकार कोण मागते?
काय व्हायचे असेल जीवनास, होउदे
रोजरोजचा असा थरार कोण मागते?
विश्व आवरायच्या उपक्रमात संकटे
जन्म घ्यायचा मधे विकार कोण मागते?
तो सुगंध, लाजरा नकार, धुंदशी मिठी
पाहिजेस तू, तुझे विचार कोण मागते?
एवढाच ये, मनास ओल येउदे जुनी
आज पावसास बेसुमार कोण मागते?