व्हायलाच हवी आता
एक आढावा-बैठक.. स्वतःबरोबरची!
पापण्यांची आणि कानांची दारं बंद करून
आत बसावं लागेल
देह, मन, बुद्धी आणि
आला तर त्या (सदैव नाराज) आत्म्याला घेऊन!
आणि मग शोधावी लागतील कारणं
आत्म्याच्या..नियमित पराभवाची,
मनाच्या..एखाद्या अकल्पित विजयाची,
देहाच्या...सहा-रिपुंशी उघड सलगीची,
बुद्धीच्या.. न पटणारी कामं उत्साहाने करण्याच्या सवयीची!
बंद दारामागे दोन-चार तास बसल्यावर,
मग त्या हसऱ्या चेहऱ्याला बाहेर पाठवायचं
पत्रकार परिषद घेण्यासाठी
आणि बाहेरच्या लेखण्या अन् कॅमेऱ्यांच्या गर्दीला सांगण्यासाठी
आंतल्या कठोर आत्मपरीक्षणाबद्दल,
सर्वांनी निर्भीडपणे मांडलेल्या मतांबद्दल,
गतकाळातल्या चुका टाळून
भविष्यात निश्चित यश देणाऱ्या नव्या धोरणाबद्दल!
तेवढी
आत फक्त चहापान होऊन संपलेल्या
बैठकीची खबर बाहेर फुटू नये
म्हणून सर्वांनी गुप्तता पाळली.... म्हणजे झालं!
----------------------------------------------------------
(जयन्ता५२)