अस्तित्व कल्पनांचे

धोक्यात आज आहे अस्तित्व कल्पनांचे
होते कधी जगावर वर्चस्व कल्पनांचे

सांगावयास सुचते जेव्हा नवे न काही
शब्दांत झाकतो मी वंध्यत्व कल्पनांचे

का शांत सर्व झाल्या तोफा धडाडणार्‍या?
वागीश्वरी, पुन्हा दे तू सत्त्व कल्पनांचे

वर्धिष्णु वीण आहे तलवार, बंदुकांची
वाढेल सोबतीने षंढत्व कल्पनांचे

शेळ्या बनून जाऊ मागून घोषणांच्या
येथे हवे कुणाला दायित्व कल्पनांचे?