पावसाचे !

दूर कोणी नाव घ्यावे पावसाचे
त्या क्षणाला गाव व्हावे पावसाचे

गंध मातीचा शिरे श्वासांमधूनी
दरवळूनी गात्र गावे पावसाचे

तेच दाटे माझिया डोळ्यात पाणी
गोत्र माझेही असावे पावसाचे

ओंजळीने थेंब झेलावे असे की
अंतराला दान जावे पावसाचे

पाखरांचे पंख घ्यावे दूर जावे
चेहऱ्याला रंग ल्यावे पावसाचे

स्पर्श त्याचा माळराने धुंद सारी
हात माझे कां नसावे पावसाचे

ही कुणाच्या चाहुलीने जाग येई
अंगणी पाऊल यावे पावसाचे