निर्दयता

मी चार पाच वर्षाचा असताना मी, माझे आई, वडील व आणखीन एक दोन नातेवाईक आगगाडीने कोणत्यातरी  मोठ्या प्रवासाला गेल्याचे आठवते. बहुधा पुलगाव किंवा इंदूर असावे. तेव्हा द्वितीय श्रेणीच्या डब्यात दरवाजापाशी खूप तिकिटाविना प्रवास करणारे, एक दोन स्टेशनापुरतेच गाडीत चढणारे असे बसायचे. त्यात अनेकदा भिकारी, अत्यंत गरीब
असलेले परंतु जवळ सात आठ बोचकी असलेले असे खूप लोक असायचे. त्या प्रवासात पाहिलेला हा प्रसंग!

एका स्टेशनपाशी आमच्या डब्याच्या दरवाजापाशी अशाच लोकांची गर्दी जमली. त्यांच्यात दोन पार्ट्या असाव्यात असे त्यांच्या संवादावरून जाणवत होते. काहीतरी जोरदार चर्चा चालली होती. गाडी सुरू व्हायच्या वेळी त्यातील चार पाच लोक आत येऊन बसले. त्यांच्यात एक प्रौढ स्त्री, एक प्रौढ पुरुष व तीन चार लहान  मुले होती. मात्र, त्यावेळी, बाहेर उभे असलेल्या चार पाच जणांपैकी एक तरुण स्त्री खूप जोरात रडायला लागली. इतर एक दोन स्त्रिया व एक पुरुष ( जो बहुधा तिचा नवरा असावा ) तिला धरून डब्यापासून मागे ओढत होते. ते रडत नव्हते, मात्र तिला ओढून लांब न्यायचा प्रयत्न करत होते. आम्हाला काही समजेना. ती स्त्री अक्षरशः रडून रडून अर्धमेली झाली होती. आम्हाला वाईट वाटत होते, पण समजत काही नव्हते. तिला कुणी मारत नव्हते, हेच आम्हाला त्यातल्यात्यात बरे वाटत होते.

गाडी सुरू झाली. ती स्त्री दारापाशी धावली. पुन्हा तिला तिच्या घरच्यांनी ओढत बाजुला नेले. आतील लोक शांत बसलेले होते. गाडीने आता वेग घेतला होता. बाहेरील रडणारी स्त्री आता हळूहळू ठिपका होऊन अदृश्य झाली.

त्यानंतर आत बसलेल्यांपैकी एक लहान मुलगी रडू लागली. असेल दोन वर्षांची! ती खूप रडत होती. किंचाळत होती. आईने जाउन पाहिले तर त्यातील प्रौढ स्त्री तिला मध्येच एखादा चिमटा काढत होती, एखादी थप्पड मारत होती. इतर दोन मुले मात्र त्यांची त्यांची खेळत होती.

हा प्रकार अर्धा तास चालू होता. शेवटी प्रौढ पुरुष त्या स्त्रीवर एकदम 'बास्स' म्हणून जोरात ओरडला. तेव्हा ते सर्व थांबले.

नंतरच्या त्यांच्या ( स्त्री व पुरुष यांच्या ) वाढलेल्या आवाजातील चर्चेतून आम्हाला समजले की बाहेर जी स्त्री रडत होती तिची ती मुलगी होती व तिच्या नवऱ्याने
वाईट आर्थिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी या गाडीतील कुटुंबाला ती मुलगी दोनशे रुपयांना विकली होती. अर्थात, हे आई म्हणालेली मी ऐकले व तेव्हा
मला ते फारसे समजलेही नाही. मात्र मी लक्षात ठेवले.

विकत मिळालेल्या मुलीबद्दल कुठलीच आस्था नसल्याने ती स्त्री तिचा छळ करून स्वतःची विकृत वृत्ती दाखवत होती. तिचा नवरा काही फार चांगला असावा असे दिसत नव्हते पण त्या लहान मुलीच्या आक्रोशाने त्याला कानठळ्या बसत असल्यामुळे वैतागून तो ओरडला होता.

त्या मुलीच्या आईच्या भावना मला मोठे झाल्यावर जाणवतात. ही घटना कवितेत मांडून मन मोकळे करू शकलो असतो खरा, पण घटना सत्य आहे हे लक्षात यावे म्हणून येथे लिहिली.

तो प्रसंग आठवला की माझे काही वेळ कामात लक्ष लागत नाही.

माणूस व पशू हे कित्येकवेळा समानच वागतात असे वाटायला वाव आहे.

असे कुणाच्याही नशिबी येऊ नये ही प्रार्थना!