माझा सदरा फाटका तुझी मखमली चोळी
मिटे अंधारझोपडी आत कल्पनांची होळी
माझ्या घामातून बीजे तुझे दार ठोठावती
तुझ्या थंड नकारांनी बाहेरच आशयती
माझी उभारी शमते नस नस सैलावत
माझी झालीस वाटते जरी लाजत लाजत
तुझे चिडके उसासे बीज ओघळ सांडणे
त्याला फुले समजुनी त्यांची रास मी रासणे
तुझा सुगंध फुलाला तुझी कोमलता त्याला
माझी जुळवाजुळव आली शेवटी फळाला
एक आरोळी जुनाट देत माळ गुंफतो मी
हार दुनियेत नेतो विकण्यास ठेवतो मी
सारी दुनिया फुलांची सारे लोक फुलवाले
एक पाटी त्यात माझी उमलुनी झुले हाले
एका गाळ्यावरी कोणी विके गुलाब चमेली
एका गाळ्यावरी कोणी विके जाईच्याही वेली
इथे झुंबड उडली तिथे झुंबड उडली
एकाहून एक अशी बोली फुलांची लागली
जिथे हार विकण्याने लोक बंगले बांधती
माझा हार ठेवण्याची भाडी खिशातून जाती
येता येता पाटी माझी तिथे सोडून येतो मी
माझ्या मोडक्या पायांना घरी ओढत नेतो मी
पुन्हा थकून भागून झोपडीला परततो
बाजाराच्या रस्त्याकडे पुन्हा निराश बघतो
आतमधे नव्हाळीचे अंग धुवून तू उभी
सारी अंधारझोपडी प्रकाशवून तू उभी
तुझ्या कणाकणावर आशयाचे नवे गंध
आणि रुतती कायेत काही उपमांचे बंध
काही कल्पनांच्या बटा तुझ्या कानास छेडती
काही वर्णनांच्या आगी तुझ्या उरात पेटती
माझे पाहत बसणे, पाठ निराश टेकणे
तुझे बरसून येणे माझ्या शब्दांना खेचणे
कूस बदलणे माझे तरी मनात पेटणे
तुझे लाडीक बोलणे माझे शब्द चाचपणे
पुन्हा घामातून बीजे तुझे दार ठोठावती
तुझ्या तप्त होकारांनी आत आत आशयती
आता माळ करायला फुले हाती कुठे येती?
उद्याच्याही बाजाराला मला कोण भाव देती?
उद्याच्याला बाजाराला काय कमवायचे मी?
माझ्या पाटीमधे उद्या काय फिरवायचे मी?
तुझ्या जिभेचा ओलावा मला हळूच सांगतो
"कमवलेच आहेस सारे इथे" मी हासतो
माझा सदरा फाटका तुझी मखमली चोळी
मिटे अंधारझोपडी आत काळज्यांची होळी
( टीप - अक्षरछंद! प्रामाणिकपणे सांगतो, पुलस्तींच्या माळ या कवितेवरून मला ही कविता सुचली. अर्थात, कविता वेगळी असली तरी थोडे तरी श्रेय पुलस्तिंचे आहेच. ट्रिगर देण्याचे! )