मन माझे ..

मन माझे ..


मन माझे अवखळ,  जसा झरा खळखळ,


नाही साचणे कुठेही, मस्त धावणे फेसाळ.


मन माझे मन माझे, चमकता काचखडा,


कधी फुटतो तुटतो, जातो अंगभर तडा.


मन माझे रानवारा, जसा वाहतो बेभान,


कधी झुळूक हवीशी, कधी भीषण तूफान.


मंद समईसारखे, मन माझे तेवणारे,


कधी होते रे विखारी, ते निखारे जळणारे.


स्वतःभोवती हे फिरे, मन माझे रे भोवरा,


धुंद आपल्या गतीत, गिरक्या घे गरगरा.


मन माझे आर्द्र घन, जसा नभी दाटलेला,


शतधारांनी करितो, ओलीचिंब या मातीला.


मन गवताची पाती, वाऱ्यावर डुलणारी,


कधी होते धारदार, तलवार ते दुधारी.


मन माझे काळी माती, मन सुपीक धरणी,


मळे फुलती स्वप्नांचे, वेड्या मनाची करणी.


मन रहाटगाडगे, जसे विहिरीवरचे,


कधी भरे काठोकाठ, रिक्त पुन्हा घट याचे.


इंद्रधनुष्य जसे की, ह्याचे अगणित रंग,


आणि जगाहून साऱ्या, याचा वेगळाच ढंग.


शांत सागरासारखे, मन माझे हे अथांग,


सुखदुःख भाव सारे, वरवरचे तरंग. 


                      -- मंदार गद्रे.