चांगला भेटेल कोणी शक्यता ही एक टक्का
एक खोटा, एक लोभी, एक चाटू, एक छक्का
मी स्वतःही चांगला आहे असे म्हणतो कुठे मी?
कोवळा होतो खरा, पण भाजुनी झालोच पक्का
भावनांना विरजुनी आंबट मनाने लोक सारे
पंगतींच्या चोचल्यांसाठी इथे विकतात चक्का
पाळतो नीती इथे त्याच्या उशाला फक्त काटे
बोलतो खोटे इथे त्यालाच लाभे लोड तक्का
'बेफिकिर' प्रुथ्वीस या विश्वामधे पर्याय नाही
स्वर्गही हा, नरकही हे, हीच दलदल, हीच मक्का