शहराकडे जाणारी पहिली बस बरोबर पावणेसहाला घरघरत आली आणि लगेच वळून अंधुक प्रकाशात आपल्या वाटोळ्या दिव्यांच्या प्रकाशझोतांचा पिवळसर सडा घालीत मार्गाला लागली.
सहा वाजता लोकल आहे, आणि स्टेशन दहा मिनिटांच्या अंतरावर आहे (मात्र नववधू प्रियेसारखे लाजत, पुढे सरत, फिरत गेल्यास नव्हे) अशी माहिती ती बस थोडक्यात चुकलेल्या एका नवख्याला देण्यासाठी दिनेश हजर झाला. पहिल्या लोकलची ठरीव माणसे किल्ली दिल्याप्रमाणे यंत्रवत आपापल्या घरांतून बाहेर पडून झपाझप स्टेशनचा मार्ग कापीत होती. त्या प्रवाहात नवख्याने स्वतःलाही मिसळून टाकले आणि समाधानाने दिनेश त्याच्या खोक्याकडे वळला.
फळ्यांचा आडोसा डोळ्यांवर धरून त्याचे खोके झोपले होते. पण त्या फळ्या एकमेकींशी फारशी जवळीक ठेवून नव्हत्या. परिणामी, दोन फळ्यांमधून कोपरभर हातदेखिल सहजपणे आत शिरू शकत असे. अशा एका भगदाडातून हात घालून त्याने आतून अडकवलेली गंजकी कडी कुरकूर-खळखळ करीत काढली. ताण कमी झाल्यामुळे दार जरा सैल झाले. मग त्याने बाहेरून लावलेली कुलूपकडी काढली.
एवढे एक काम नख-बोट न चेमटता पार पडल्यावर त्याला समाधान वाटले. त्या आनंदात त्याने 'घनःश्याम सुंदरा'ची लकेर हळूहळू डोळे चोळत जागे होणाऱ्या आसमंताला धक्का देत सोडून दिली, आणि बादली घेऊन तो सार्वजनिक नळाकडे निघाला.
नळावर रुक्मिणी कपडे धूत होती. तिची बादली बाजूला सारून त्याने आपली बादली लावली, आणि मान वळवून आरोळी ठोकली, "सदाशेट, एक कडक चहा, दोन नरम पाव" आणि बादली भरेस्तोवर तो पुनःपुन्हा 'घनःश्याम सुंदरा'ला डिवचत राहिला. खोक्याशी पोचल्यावर मात्र त्याने आपल्या स्वरयंत्राला विराम दिला आणि मन लावून तो सडा घालू लागला.
मातीचा वास आणि पाण्याचे सूक्ष्म तुषार अशा गंध-स्पर्शाच्या संमिश्र संवेदनेने लिली जागी झाली. उठून तिने एकदा अंग ताणून घेतले आणि ती दिनेशच्या खोक्यासमोर आली. ओलसर मातीचा वास तिने मन भरून हुंगून घेतला आणि अंग फडाफडा झटकून सगळा आळस पार पळवून लावला. मग नजर दिनेशवर लावून तिने बूड टेकले.
सडा घालून झाल्यावर दिनेश आत शिरला. चिमूटभर जागेत स्वतःला खुपसून त्याने पाने गुंडाळलेल्या फडक्यावर पाणी शिंपडले आणि चहाची वाट पाहत तो बसून राहिला. लिलीला नजरेनेच कुरवाळून त्याने नजर सदाशेटच्या टपरीकडे वळवली.
नजरेने अथवा स्पर्शाने कुरवाळावे असे लिलीमध्ये काही फारसे नव्हते. एका डोळ्यावरचे केस पार कानापर्यंत लूत भरल्यामुळे उडाले होते. एका कानाचा टवका उडाला होता. पोटा-पाठीवरचे केस पुंजक्या-पुंजक्यांनी अस्तित्व दर्शवीत होते. शेपटी भिजल्या दोरखंडासारखी निर्जीव भासत होती.
पण तिचे मूळ रूप असे नव्हते याचीही साक्ष तिच्या अस्तित्वातून उमटत होती. लहानसर बाकदार चण आणि तिचे डोळे. काळसर बदामी रंगाचे तुकतुकीत काचेच्या गोट्यांसारखे डोळे. भोगलेल्या हिवाळ्या-पावसाळ्यांची साक्ष देणारे, बऱ्यावाईट अनुभवांची, उद्ध्वस्त भावविश्वाची कहाणी सांगणारे डोळे.
चहा आला. चहाचा कप पोराच्या हातून फळकुटावर पोचेपर्यंत पहिले गिऱ्हाईकही आले. उभट पिशवीतला डबा संभाळत नाना कोरड्यांनी "एक ब्रिस्टॉल पाकिट" अशी मागणी केली.
"काय नाना, आज लौकर? "
"हो. जरा मिसेस जाणार आहे बाहेरगावी, तिचे रिझर्वेशन करून मग कामावर. "
"हो, सुट्या लागतील ना आता, गर्दी होईल" असे पुटपुटत दिनेशने पहिली नोट कपाळाला टेकवून लाकडी खणात सारली.
कडक चहाचा पहिला घोट घेऊन त्याने दोन पाव लिलीच्या दिशेने उडवले. गुरुत्त्वाकर्षणाच्या नियमांनी बद्ध झालेली त्या पावांची गती लिलीने आपल्या उघडलेल्या तोंडाने हवेतच थांबवली आणि पुढचे दोन्ही पाय जमिनीसरसे टेकवून त्या मेजावर तिने न्याहारी सुरू केली.
दोन पाव चाबलताना ती सुखावली. आता पुढचा अन्नयोग तसा अनिश्चितच होता, पण तिला त्याची चिंता नव्हती. टेकडीजवळच्या कारखान्यातील जेवणवेळेचा भोंगा तिला मालगोदामापाठच्या चिंचेच्या झाडाखाली गाठायचा होता. वेळ बक्कळ होता, पण त्या भेटीची स्वप्ने रंगवण्यापुरेसा मुळीच नव्हता. जेवढा आहे तेवढ्या वेळाचा सदुपयोग करून स्वप्ने रंगवावीत असा विचार करून ती मालगोदामाच्या दिशेने चालू लागली.
आनंदनगरमधील बंगल्यांच्यामधून वाट काढीत झगझगता सूर्य क्षितीजापासून दूर पळायच्या खटपटीत होता. उन्हाळ्यातील सकाळचा एक विशिष्ट वास आणि सूर्यकिरणांचा चटचटीत स्पर्श सगळीकडे पसरला होता.
लिली आपल्या मनाच्या पडद्यावर खंडूचे चित्र रेखीत चालली होती.
खंडू अस्सल धनगरी वाणाचा होता. हॉस्पिटलमागच्या प्रधानांच्या बंगल्याबाहेर त्यांच्या छोट्या मुलाशी चेंडू खेळताना तिने त्याला प्रथम पाहिले होते. विनाकारण दगड फेकत हिंडणाऱ्या पोरांच्या टोळक्यापासून बचावण्यासाठी ती हॉस्पिटलमागच्या भिंतीला लपली होती. जरा चढलेल्या उन्हात खंडूच्या तकतकणाऱ्या शरीरावर डोळे ठरत नव्हते. हवेत फेकलेला चेंडू पकडण्यासाठी तो उसळी मारे तेव्हा जणू विरह सहन न होणारी, मीलनासाठी आसुसलेली पृथ्वीच आपले बोट उंचावून पश्चिम-कुशीत विसावण्यासाठी सूर्याला खुणावते आहे असे वाटे. लिली भान हरपून पाहत बसली.
मग बंगल्यातून आवाज, आणि त्यापाठोपाठ एक आकर्षक स्त्रीदेह बाहेर आला. "अनिश, आता चल बघू आत. "
हाकेसरशी खंडू झेपा टाकत फाटकापाशी पोचला आणि फाटक उघडताच त्याने आपले पुढचे दोन्ही पाय उंचावून त्या स्त्रीच्या पोटावर टेकले. तिने ते तिच्या हातात घेतले आणि गोऱ्या-गुलाबी बोटांनी ती त्याचे डोके कुरवाळू लागली. अनिशही येऊन वासरासारखा आईला ढुशा देत उभा राहिला.
बघताबघता लिली कावरीबावरी झाली. या सुखी, परिपूर्ण चित्राला आपल्या नजरेचा विटाळ तर होणार नाही ना या विचाराने तिने डोळे घट्ट मिटून घेतले.
घोंघावणाऱ्या फेसाळ धबधब्यासारखी स्मृतीचित्रे तिच्या मिटल्या डोळ्यांसमोर कोसळू लागली. आकार घेऊ लागली. कवटाळू लागली. फुटू लागली.
तिलाही असेच छानसे घर होते. बस्कर म्हणून कश्मिरी गालिचाचा वेलबुट्टीदार तुकडा होता. दुधात हाताच्या तळव्याएवढा (तोदेखिल मोठ्या माणसाचा पूर्ण पसरलेला तळवा) सायीचा तुकडा हमखास असे. आणि तिची भाकरी तर नखाएवढीसुद्धा करपलेली नसे.
रविवारी तर उत्सवच असे. सागुतीतील उरलेली हाडके तिच्या वाट्याला येत नसत, तर तिच्यासाठी मालक स्वतः जाऊन वेगळी सागुती घेऊन येत असे.
आणि संजय. काळ्याभोर डोळ्यांचा, बिनकरपलेल्या उपासाच्या थालीपीठाच्या रंगाचा, खारीसारखा कायम तुरतुरणारा संजय. पांढराफेक शर्ट आणि खाकी चड्डी घालून, पाटी-दप्तर घेऊन तो शाळेला निघे तेव्हा लिलीला भरून येई. संध्याकाळपर्यंत तिचा विरह सहन करण्याच्या कल्पनेने तो देखिल कावराबावरा होई.
तसा त्याने तिला शाळेत घेऊन जायचा प्रयत्न करून पाहिला होता एकदा.
पहिला गणिताचा तास निर्घोर पार पडला होता. फक्त वर्गातली सगळी मुले मागे संजयकडे का बघताहेत हे पाटील सरांना कळले नव्हते. संजय आनंदाच्या ऊर्मी आपल्या चेहऱ्यावरून पुसून टाकायचा आटोकाट यत्न करीत मधूनच बाकाखाली हात घालून तिचे डोके कुरवाळीत होता.
पुढच्या हिंदीच्या तासाला मात्र घोळ झाला. एका मुलाच्या दप्तरातून एक गोटी बाहेर पडली. पडली ती टक टक करीत फळ्याकडेच निघाली. तासभर मुकाट बसून कंटाळलेल्या लिलीला आपली सुस्ती घालवण्याचा उत्तम मार्ग सापडला. संजय तिला आवरेपर्यंत ती चपळाईने बाकाखालून बाहेर निघाली. जगदाळे मास्तर तंबाकू मळून ती तोंडात टाकणार तोच लिली त्यांच्या पायाला जाऊन धडकली. निम्मी मळलेली तंबाकू मास्तरांच्या नाकात गेली. उरलेली मिशीत अडकली. परिणामी मास्तरांनी एक वर्ग हादरवून टाकणारी शिंक ठोकली. लिली फारच गोंधळली. तिने मास्तरांना पुन्हा धडक मारली. त्यांना तशीही कुत्र्यांची भीती वाटे, त्यामुळे त्यांनी आता एक आरोळी ठोकली.
अखेर दिवसभरासाठी संजयला शाळेतून हाकलून देण्यात आले. मग दिवसभर संजय घरी होता म्हणून तिला आनंद झाला, पण संध्याकाळी बाबांचा रागीट आवाज तिने पहिल्यांदाच ऐकला, आणि शाळेत जाणे शक्य नाही असा निष्कर्ष काढला.
असे मजेत आणि सुखात दिवस चालले होते. आणि त्या घरावर तो पावसाळा कोसळला. उजाड माळरानावर एकाकी पांथस्थावर पोफळाएवढ्या गारा कोसळाव्यात तसा कोसळला.
पावसाच्या रिपरिपीत एका पांढऱ्याधोट लांबलचक गाडीतून संजयच्या आईचा देह आला. घरात कल्लोळ उसळला. लिलीकडे कुळी लक्ष दिले नाही अशी ती पहिली रात्र. रडून दमगीर झालेला संजय पहाटे आला आणि लिलीच्या गळ्याला मिठी मारून झोपून गेला.
सकाळपासून घरात माणसांची गर्दी जमू लागली. त्यातल्या एका मुलाने तिची शेपूट करकचून पिरगळली आणि दुसऱ्याने दातओठ खाऊन तिच्या कानांचे गड्डे उपटले, पण तिने हूं की चूं केले नाही. दोन पायांवर डोके ठेवून ती शांत पडून राहिली. टिपे गाळीत राहिली. कुणीतरी तिच्यासमोर शिळ्या भात-भाजीचे मिश्रण आणून ओतले. तिने तिकडे ढुंकूनही पाहिले नाही.
संजयला कुठेतरी बाहेर पाठवले गेले. लिलीला रामू माळी जमेल तसे खायला घाली. हळूहळू बाबांची घरी येण्याची वेळ पुढे पुढे सरकत गेली. एक दिवस दारातली निळीशार लांबलचक गाडी नाहीशी झाली. त्या रात्री बाबा घरी आले ते झोकांड्या खातच. त्यांनी येऊन थेट तिच्या बस्करावर, अंगावर भडाभडा उलटी केली आणि मग तिला लाथांनी तुडवले. कढ आवरीत लिली शांतच राहिली.
एक दिवस संजय आला. किती हडकुळा झाला होता तो! आला आणि तिच्या सुकटलेल्या अंगावर अंग लोटून देऊन हमसाहमशी रडू लागला. ती लालगुलाबी जिभेने त्याचे तोंड चाटू लागली.
तिकडून बाबा आले. हिसडा मारून त्यांनी संजयला दूर केले. लिलीच्या गळ्यातली साखळी काढून घेतली आणि ती दुमती करून त्यांनी सपासप तिच्या पाठीवर फटकारे ओढले. अचानक पाण्यात ढकलून द्यावे तशी बावरलेली लिली भेदरून पळत सुटली. आणि रस्त्यावर आली. कायमचीच.
खडबडून तिने डोळे उघडले. अनिश शाळेला जायला निघाला होता. शेपटी जोरजोरात हलवून खंडू त्याला निरोप देत होता. जड मनाने लिली तेथून निघाली.
तिची खंडूशी गाठ पडली मंदिराच्या चौकात. शिंदे सायकलवाल्याच्या आडदांड टायगरला सणक आली. रुबाबात सरळ येऊन त्याने तिच्यावर हल्ला चढवला. धटिंगण कुत्र्यांची दांडगाई तिच्या सवयीची झाली होती. जमेल तसा आणि जमेल त्या दिशेला जीव घेऊन पळ काढणे एवढेच तिचे बचावतंत्र होते. पण आजचा रंग वेगळाच होता. टायगरच्या राक्षसी बळापुढे तिची धडपड व्यर्थ जाणार असे दिसत होते.
कुठूनतरी बाणासारखा खंड्या झेपावत आला. पहिल्या झटक्यातच त्याने त्या धटिंगणाच्या मानेच जबडाभरून डासका काढला. काय होते आहे हे कळायच्या आत आपल्या नख्या, दात आणि वेतासारखे लवलवते शरीर यांच्या बळावर खंडूने पारडे त्याच्या बाजूला झुकवून पार जमिनीला टेकवले.
काहीच न घडल्यासारखा डुलत खंडू घरी निघाला तेव्हा न राहवून लिलीही त्याच्या मागोमाग गेली.
घराच्या वळणावर तो थांबला तेव्हा धीर करून तिने त्याच्या खांद्याच्या ओरखड्याला जीभ लावली. लाजून तो बाजूला झाल. हलकेच तिला एक ढुशी देऊन पळून गेला.
मग हळूहळू त्यांचा संवाद जुळत गेला. भेटीगाठी वाढल्या. मने उघडी झाली.
लिलीला मन उघडे करायला मिळण्याची ती पहिलीच वेळ. सुरुवातीला ती गांगरली, बावरली. पण मग तिने स्वतःला सावरले. झुळझुळत उलगडत चाललेल्या आलापीमध्ये कणस्वर लागणार नाही हे मन लावून जपले.
पण सुरुवातीनंतर हे जपायची गरज उरली नाही. विचारांची जागा भावनेने घेतली. अनावश्यक गोष्टींच्या, स्मृतींच्या कपच्या उडू लागल्या. शिल्प आकार घेऊ लागले.
"खंडू, तुला खरंच मी कशी आवडते रे? अशी वेडीविद्री... "
"चूप. असं बोलशील तर बघ. पुन्हा बोलणार नाही तुझ्याशी. कधीच. "
"असा रागावू नकोस ना रे. पण... "
"लिली, माझ्या दृष्टीने तू खूप सुंदर आहेस. खूप. विश्वास आहे ना माझ्यावर? मग असलं काहीतरी भयाकारी बडबडायचं नाही."
आज तो तिला घेऊन घरी जाणार होता. सगळ्यांशी ओळख करून देणार होता. त्यांनी मिळून रंगवलेल्या स्वप्नाची, तिच्या भावी गृहप्रवेशाची तयारी म्हणून.
"पण तुझ्या अनिशला मी आवडेन का रे? मला तर भीतीच वाटते. "
"खुळीच आहेस. अगं तो खूप साधा सरळ आहे. जीव लावला की भरभरून प्रेम देतो. " खंडूने आपल्या ओलसर नाकाने तिच्या कानामागे कुरवाळायला सुरुवात केली. तिने सुखाने डोळे मिटले.
अख्ख्या नारळाएवढा एक दगड तिच्या पाठीच्या कण्यावर बद्दकन आपटला आणि तिने भेदरून डोळे उघडले. भाल्याच्या पात्यासारखी तीक्ष्ण वेदना तिच्या अंगभर जळजळत गेली. दगडफेक्या पोरांचा कळप इथेही येऊन पोचला होता. जीव मुठीत धरून ती धावू लागली. चटचटीत तापलेल्या काळ्या डांबरी रस्त्यावर तिच्या नख्या वाजू लागल्या. कारखान्याचा भोंगा झाला नि खंडू घरातून बाहेर पडला याकडे तिचे लक्षच उरले नाही. दगडांचा मारा चुकवत, उन्हाच्या झळा स्वीकारत, धापा टाकत, ती पळत राहिली.
खंडूला क्षणभर काहीच दिसले-समजले नाही. मग तो त्वेषाने गुरगुरत त्या मुलांवर धावून गेला. त्यांची पांगापांग झाली. "आता सगळे ठीक आहे लिली, मी आलो आहे" हे सांगण्यासाठी तो भान विसरून तिच्यामागे झेपावला.
काळजीपूर्वक बस चालवण्याबद्दल मारणेचा लौकिक कधीच नव्हता. प्रवाशांनी भरलेली गाडी त्याला चालवायला देण्यात येते याबद्दल सदैव आश्चर्य व्यक्त करण्यात येत असे.
तरीही हे नोंदवायला हवे की वाऱ्यासारखा सुसाटलेला तो कुत्रा मध्ये आला तेव्हा मारणेने कचकचीत ब्रेक मारला. पहिल्या बाकावरच्या आजीबाईंचा चष्मा उडाला. ऐटीत शेजारच्या मुलीशी बोलणाऱ्या एका सिनेमाछाप नायकाचे नाक फुटले. जाधव कंडक्टर तर पोत्यासारखा बुदकन गँगवेमध्येच सपाट पडला.
तोफगोळ्यासारखा खंडू उडाला आणि "लिली" अशी आर्त हाक मारत तिच्याजवळच्या दगडावर आपटला. प्राण ओसरून गेल्यासारखी लिली जागीच थांबली. त्याला हाका मारू लागली. खंडूच्या डोळ्यांतील प्राणज्योत फडफडू लागली. आवेगाने लिली त्याला ढुशा मारू लागली. कुरवाळू लागली. चाटू लागली.
अचानक विरविरीत कापडाच्या गच्च ओल्या बोळ्यासारखे खंडूचे शरीर निर्जीव झाले.
शनिवार म्हणून शाळेतून लौकर घरी परतणाऱ्या अनिशने हे पाहिले. दप्तर टाकून देऊन पडत ठेचकाळत तो खंडूपाशी आला. त्याच्या डोळ्यात हताश संताप दाटून आला. प्राण एकवटून त्याने लिलीला खंडूपासून बाजूला केले आणि दोन्ही हातांनी तो तिला फडाफड मारू लागला, तिचे उरलेसुरले केस उपटू लागला.
लिली शांतपणे उभी राहिली. मारून मारून थकलेला अनिश खंडूच्या गळ्यात गळा घालून रस्त्यावरच पसरला. मनाच्या तळापासून खळबळ उडवणारा आकांत करू लागला. "दुष्ट, घाणेरडी, तूच मारलंस माझ्या खंडूला. तूच. तूच. चालती हो. चालती हो इथून. " पुढचे शब्द हुंदक्यांत विलीन झाले.
कोणीतरी ढकलत नेल्यासारखी लिली बाजूला झाली. मालगोदामामागच्या चिंचेच्या झाडाखाली जाऊन उभी राहिली.
चिंचेच्या जाळीदार सावलीतील कवडसे तिच्या अंगावर नाचत राहिले.