आज माझे मन सुखाला पाहिजे आहे म्हणे
चांगले काही बऱ्याला पाहिजे आहे म्हणे
मोल सांगावे किती हे माहिती आहे कुठे?
आज मी साऱ्या जगाला पाहिजे आहे म्हणे
चांदण्याच्या उत्सवाची पत्रिका आली मला
आपले मेहूण त्याला पाहिजे आहे म्हणे
रोजगारी पांडवांनो चाक काढा एवढे
कर्ण आता सारथ्याला पाहिजे आहे म्हणे
मीच गुलदस्त्यात जावे आणि सांगावे मला
'एकदा मीही स्वतःला पाहिजे आहे म्हणे'
या, रचा रामायणे, कलियूग आले याइथे
रोज सीता रावणाला पाहिजे आहे म्हणे
या जगाला 'बेफिकिर'ही शोभतो आहे, ... म्हणुन
अन्यथा मृत्यूस साला पाहिजे आहे म्हणे