तृषा

खोलवर सार्‍या मनांच्या गाडली आहे तृषा
मात्र वसने सोवळ्याची नेसली आहे तृषा

हो, दिला फेसाळ प्याला, मात्र डोळे चुकविले
हाय, साकीने न माझी जाणली आहे तृषा

काल मधुशालेत बसलो पंडितासोबत जरा
लागली परमेश्वराची; बाटली आहे तृषा

वैष्णवाला नेत आहे आज मधुशालेत मी
त्यासही सोमेश्वराची लागली आहे तृषा

कुंकवाचा घ्या करंडा अन्‌ भरा मळवट तिचे
साथ ती आजन्म देते, सावली आहे तृषा

जीवनाच्या दोन घोटांहून नव्हते मागणे
लीलया त्यांच्यातही सामावली आहे तृषा

वारुणी मी जीवनाची आणली होती किती ?
संपली ती, संपलो मी, संपली आहे तृषा

द्याल अग्नी मज जिथे, बांधा तिथे मंदिर तिचे
माझियासंगे सती ही चालली आहे तृषा