वजनाचे ओझे?

वजनाचे ओझे?

                     कोणती साडी नेसायची ते ऐनवेळी ठरवता येत नाही याचे कारण साडी वर्षातून फार कमी वेळा घातली जाते हे नसून
साडीवरचा ब्लाऊज नेमका अंगात शिरेल याची खात्री नसते हे आहे. अनेक टीशर्ट , शर्ट , पॅन्ट हॅंगरवरून प्रत्यक्षात कधी घालता येतील अशा विचार मनात आला की  नुसता सुस्कारा टाकता येतो.  हळूहळू तुमचे आमचे मन आणखी निगरगट्ट होते आणि आपल्या वजनाचे सर्मथन
करू लागते. बोलणे, शारीरिक हावभाव, वेगळे कपडे, सौंदर्य प्रसाधने, वेगळी शरीरयष्टी अशा कोणत्यातरी वैशिष्ट्यामुळे लोक चारजणात उठून दिसतात. अनेकदा ते त्याकरता मुद्दाम प्रयत्न करतात किंवा काही वेळा त्यांचा तसा उद्देश नसतोही. पण लोकांचे लक्ष गेले  की चार शब्द , टोमणे आलेच. वजन हा या लक्ष वेधून घेणार्‍या व बोलणार्‍या सर्वांचा लाडका मुद्दा आहे!  नको वस्तू तरी ठेव घरात,  खोलीत नको तर ठेव माळ्यावर असे करत जशी अडगळ वाढत जाते तसा  लठ्ठपणाही वाढीस लागतो.   अनेकदा चुकीचा आहार आणि जीवनशैली यामुळे लठ्ठपणाला निमंत्रण मिळते. त्याकरता अमुकच वय असावे असे सुद्धा नाही.  काही मंडळी जाणूनबुजून वाढणार्‍या वजनाकडे दुर्लक्ष करतात, बरेच जण घाबरून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात, पण प्रत्यक्ष कृती करणार्‍यांची संख्या कमी आढळते. वयाचे बंधन न बाळगता आपल्या शरीराबद्दल जागरूक असणे हा विचार गेल्या पाच सहा वर्षात जागा झाला आहे.   त्या जागृतीची तीव्रता आता कमी अधिक प्रमाणात जाणवते आहे.

फोटो शेयर केले किंवा चार सहा महिन्यांच्या कालावधीने मैत्रिणी  प्रत्यक्ष भेटल्यावर ', किती मजा, तुझे वजन बरेच कमी दिसते' ,
काय करतेस सांग मला पण '! असा चित्कार, असूया / कौतुकमिश्रित  वाक्य कानावर आल्याखेरीज संभाषण होऊच शकत नाही. !.
आजच्या मोकळ्या मैत्रीच्या वातावरणात  मित्रसुद्धा मैत्रिणीला तिच्या वजनाची जाणीव करून देतो. सगळ्या जिम्स, सकाळी फिरायला जाणे, जेवण न घेणे, कोणत्यातरी एकाच प्रकारच्या आहाराचा अतिरेक हे सर्व मॉडेलसारखे बारीक राहण्याकरता म्हणून जास्त प्रमाणात चालते. त्यात आपले आरोग्य चांगले राहावे या कळीच्या मुद्द्याला प्राधान्य  देण्याची कोणाचीच तयारी नाही. लठठ बारीक सगळ्याच स्त्रिया  वजन कमी करण्याच्या मोहिमा आखत असतात / पार पाडत असतात अथवा निराश होत असतात.  ही निराशा लठ्ठ आणि चुणचुणीत ‘हेल्दी वेट’ असणार्‍या स्त्रियांना तेवढीच सारखी पोखरत असते हे जळजळीत वास्तव आहे.  आम्हाला बारीक बायको हवी असा आग्रह धरणार्‍या, आपल्या बायकोला तिच्या वजनावरून चार सूचना देणार्‍या किती पुरुषांना शाहरुखसारखे सिक्स पॅक शक्य आहेत? (सिगरेटचे नाहीत ).किती पुरुष एका स्त्रीकडून शरीरसौष्ठव आवडले नाही म्हणून नकार सहन करू शकतात? सुटलेले पुरुषांचे पोट  हे वाढत्या वयाबरोबर सौख्याचे चिन्ह  .. पण बाळंतपणानंतर लगेच स्त्री मात्र कशी शिडशिडीत व्हायला हवी.  गर्भारपणातही स्त्रीचे वजन न वाढता गुटगुटीत बाळाचा जन्म होण्यावर संशोधन चालू असेल कुठेतरी ..एवढा समाज विषम विचारांनी भारलेला आहे.  एकंदरीत कथा, मासिके, चित्रपट या माध्यमांचा वाढता प्रभाव स्त्रियांचे वजन कमी करतो आहे. त्यांच्या मनात तसेच  तरुणांच्या, पुरुषांच्या मनात जाहिरातीत बघतो तशी सडसडीत आणि कायम मॉडेल सारखी दिसेल अशी स्त्रीची एक प्रतिमा ठसवतो आहे. वरवरच्या सौंदर्याला जेवढे महत्त्व देण्याची वृत्ती वाढते आहे . वयानुसार होणारे बदल नाकारणे, लपवणे याकडे कल वाढतो आहे. माणसाला मरणाची भिती असते तशीच भिती असते वार्धक्याची.  एकीकडे प्रत्यक्षात चाळिशीला टक्कल पडणे, केस पांढरे होणे याचे प्रमाण वाढते आहे तसे साठीच्या व्यक्तीची कलप लावून ते केस काळे आहेत , आपण तरुण आहोत हे दाखवण्याची धडपडही वाढते आहे.  लहान मुलाला व्यक्तिमत्त्वाचा विकास आणि मनाचे सौंदर्य यावर धडे देणारा हाच का समाज? 

शाळा कॉलेज व इतर सावर्जनिक ठिकाणी लठ्ठ व्यक्ती दिसली की तिच्या चेष्टामस्करीला उधाण येते.  त्यातही लठ्ठपणामुळे स्त्री जास्तीच टोमण्यांची शिकार होते . व्यंगचित्रे, विनोद , कथा कोणतेही माध्यम याला अपवाद नाही.  लहान असताना मूल बारीक आहे म्हणून त्याची काळजी करणारी आई ;दहा वर्षातच तेच मूल लठ्ठ झाले म्हणून काळजी करू लागते.. किंवा आपली तीच मुलगी अनावश्यक असताना अयोग्य पद्धतीने बारीक राहण्याचे प्रयत्न करते आहे म्हणूनही सैरभैर होते? या वजनाच्या बागुलबुवामुळे एक शेंगदाणा तोंडात घालताना किती कॅलरी वाढणार ही चिंता मनाला कुरतडत असते. ज्या स्त्री मॉडेलचा ध्यास पुरुषांना असतो त्यांचे प्रत्यक्ष आयुष्य बघितले तर धक्कादायक असते.  युरोपअमेरिकेत या मॉडेल होण्याच्या या हव्यासाचा शरीरावर मनावर नको तो परिणाम झाला नाही तर नवल .अनेक स्त्रीपुरुष आहारविषयक  मानसिक समस्यांच्या ब़ळी ठरल्या आहेत.  हा हव्यास एक विकृती ठरली आहे. दुसरीकडे वाढता वाढता वाढे अशी खरोखर स्थिती असताना मुठीमुठीने बकाणे भरणारे ,त्याविषयी बेफिकीर असणारे  लोकही आहेतच.  हे सुद्धा आरोग्याला धोकादायकच.   योग्य वजन असणे हे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे म्हणून वजन आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे . प्रत्येकाची शारीरिक ठेवण , आहार विहार बघून त्याचे हेल्दी वेट वेगळे असणार हे नक्कीच आहे. काही आजार, व्याधी आणि औषधांचे परिणाम यामुळे वजन कमी जास्त होणार हे सुद्धा आहेच.

लठ्ठपणा केवळ आहारविहार यामुळे होतो अथवा केवळ अनुवंशिक असतो असे नाही. लठ्ठपणा हा एक आजार आहे. तो कोणत्या विषाणूंमुळे जिवाणूंमुळे होतो यावर संशोधन झाले आहे. त्यामुळे वजन नक्की कसे वाढते आहे, कशामुळे वाढते आहे याचा शोध घेऊन त्यावर उपाय करणे योग्य आहे. आहारावर नियंत्रण ठेवणे आणि त्याचा अतिरेक या दोन्हीमधले अंतर समजणे आवश्यक आहे.  लोकांकडे लक्ष द्यायचे नाही, मनाला येईल तेच करायचे यामुळे  काही काळ त्यामुळे आनंदात जातोही. स्त्रीपुरुष यात जेमतेम फरक लक्षात येईल असे दुकानात उभे असणारे मॉडेल्स, जाहिरातीतले स्त्री पुरुष मग आपल्याकडे बघून हसत आहेत असा भास होऊ लागतो. जगातली सगळी बारीक माणसे आपल्याचकडे बोट दाखवत आहेत, ते आनंदात जगत आहेत आणि आपण ओझ्याखाली दबले आहोत अशी जाणीव होते.  यातून सुटका नाही .. असे जर मनात असेल तर तो विचार झटकून टाका, धावा पळा , आहाराविषयी जागरूक राहा. लोकांचे लक्ष कशामुळे वेधायचे हे तुमच्या हातात आहे!   माझ्या मन्याला तूपसाखर पोळी खूप आवडते, तो भाजीला हात लावेल तर शपथ, माझ्या बाबीला बटाटेवडा इतका आवडतो म्हणून सांगू अशा कौतुकामुळे आपल्या मुलांना नको त्या सवयी लागत आहेत याची जाणीव घरातल्या प्रत्येकाला असावी. त्यावर वेळीच योग्य कृती व्हावी तरच या मुलांचे पुढे वाढता वाढता वाढे असे होणार नाही.