छकुली

खेळात मग्न होती, शाळेत जात होती
अपुली जुनीच छकुली अजुनी मनात होती
हसणे, रुसून बसणे, चिडणे, कधी चिडवणे
घरपण घरास होते जेव्हा घरात होती

गाडीवरून नेणे, घेणे फुगा, फुटाणे
बागेत भेळ खाणे, झोके फुलाप्रमाणे
पडणे मधेच, रडणे, एका क्षणात हसणे
सुखवायला स्वतःला लक्षावधी बहाणे

अभ्यास आणि शाळा, नियमीतशी परीक्षा
शाळेत न्यावयाला तिष्ठून एक  रिक्षा
जाताच ती घराला व्यापायची निराशा
साऱ्या क्षणाक्षणांना केवळ तिची प्रतीक्षा

कसलाच हट्ट नाही, होती हुषारसुद्धा
दिलदारतेत घेणे खेळात हारसुद्धा
ती नम्रता मनाची, वाचेमधे मृदूता
साजायचे वयाला सारे विचारसुद्धा

आली वयात तेव्हा लाखात एक झाली
अंगात भान होते, रंगात एक लाली
जाणीव होत होती 'चिमणी उडेल आता'
घरटे उजाडण्याची इतक्यात वेळ आली?

कर्तव्य याद होते बापास आपलेही
स्थळही तिला मिळाले लाखात चांगलेही
साखरपुड्यास थोडी आली फिरून तेव्हा
सोडायचे घराला हे शल्य वाटलेही

थोडाच काळ होता लग्नास बाहुलीच्या
सोडायचेच होते घरट्यास सावलीच्या
बापाकडे तिला तर बघवायचेच नाही
हमसायची सदा ती मांडीत माउलीच्या

सुखवायचे तिलाही कौतूक पाहुण्यांचे
आवाज बांगड्यांचे, आकार दागिन्यांचे
साड्या हरेकवेळी नेसायला नव्याशा
आहेर होत होते साऱ्या घरातल्यांचे

उरल्यात दोन रात्री त्या देवदेवकाला
आईकडेच झोपे छकुली रडावयाला
उरलाच वेळ नाही मागे बघायलाही
पाहून ती तयारी अश्रू फुटे घराला

कार्यालयात निघता सुटते मिठी कुणाची?
बेभान लाट भिजवे साऱ्यास आसवांची
टाळून वेळ बाबा रिक्षा बघून येती
छकुलीसमोर येणे हिम्मत बने न त्यांची

सीमांतपूजनाने सुरुवात जाहलेली
कार्यालयात 'त्यांची' बारात पोचलेली
चोवीस तास केवळ बघता पसार झाले
नूतन वधू-वरांची ही गाठ बांधलेली

झाले पुन्हा उखाणे, भरवून घास झाले
अन तेवढ्याचपुरते सारे सुहास झाले
गेली दुपार टळूनी, गेले निघून कोणी
उरले घरातले अन बाबा उदास झाले

वरपक्ष ज्या क्षणाला जाण्या तयार झाला
कार्यालयातुनीही तो हुंदका निघाला
सारे थिजून गेले पाहून ती बिदाई
माहेर सोडताना दुसराच जन्म आला

छकुली अता अताशा येते सहज घरीही
झाली बरीच वर्षे, मुलगा कडेवरीही
आनंद खूप होतो येताच ती घरी... पण
पहिल्या सुखाहुनी तो पडतो कमी तरीही

पहिल्या सुखाहुनी तो पडतो कमी तरीही