गुंतवू नकोस.... देह ठेवला असेल तर
मी उगाच एक डाव खेळला असेल तर?
कारणास कारणे नि त्यांस कारणे पुन्हा
मूळ शोधण्यास जीव नेमला असेल तर?
काय माहिती... जिला नमेन त्याच मूर्तिने
माणसापुढेच हात टेकला असेल तर?
अर्थहीनतेस अर्थ द्यायला हवाच का?
मी सहज म्हणून जन्म घेतला असेल तर?
घेतलेस ते इथेच सोडलेस तू जरी
मन तपासण्यास हेर पेरला असेल तर?
भिन्न मिश्रणे जमीन, तेज, तोय, नभ, हवा
त्यात काय जर प्रसंग बेतला असेल तर?
'बेफिकीर' या जगात नम्र राहणे बरे
गोल फक्त हा सजीव ठेवला असेल तर?