प्रतिसाद द्या
काय नुसते ऐकता; प्रतिसाद द्या!
हातची राखून द्या; पण दाद द्या !
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही —
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या!
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही; तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील! त्यांना याद द्या!
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या!
एवढा बहिरेपणा नाही बरा—
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या!
व्हायचे सैतान हे डोके रिते—
त्यास काही छंद लावा, नाद द्या!