भल्या पहाटे राणीच्या मृत्युची बातमी आली. आम्ही सगळेच अवाक झालो. तिची तब्येत बरी नसायची पण अशी काही बातमी येईल ही अपेक्षा नव्हती. तडक मी, बाबा आणि आई विनोद मामाच्या घरी जायला निघालो.
त्याच्याकडे गेल्यावर काय बोलायचं हा मोठा प्रश्नच होता. अशा वेळी काय बोलायचं हे मला आजतागायत समजू शकलेलं नाही. आईनं विषय काढून मामीला विचारलं, ''सुलू, कसं काय गं अचानक झालं हे? मनात सुद्धा नव्हतं असं काही ऐकावं लागेल. दोन आठवड्यांपूर्वी राणी माझ्याशी बोलली होती फोनवर. खूप बोर होतंय, माझ्याकडे राहायला यावसं वाटतंय म्हणत होती. मी म्हण्टलंही तिला कधीही ये म्हणून. अभ्याला न्यायला पाठवू का? तर नको म्हणाली. पण हे काय होऊन बसलं गं.'' आई आणि मामी दोघींनाही दुःख आवरेना.
राणीचा माझ्या आईवर आणि एकंदरीत आम्हा सगळ्यांवरच फार जीव होता. आईला मुलीची पहिल्यापासून आवड. त्यामुळे राणी तिची फार लाडकी होती. तिला सासरी होणारा त्रास, नवऱ्याकडून मिळणारी वागणूक याबद्दल ती आमच्याशी नेहमी बोलायची. आईवर असलेल्या विश्वासामुळे मामीला माहित नसलेल्या राणीच्या काही गोष्टी आईला आधी कळायच्या. अर्थात आईनी मामीपासून कधीच काही लपवलं नाही आणि मामीचाही आईवर पूर्ण विश्वास होता.
जरा वेळानी दाराची बेल वाजली. मामानी दार उघडलं तर राणीचा नवरा आणि सासरे आले होते. त्या दोघांना पाहून मामीच्या डोक्यात काय सणक गेली कुणास ठाऊक. मामी मोठ्यांदा ओरडून म्हणाली, ''अरे रांडेच्या, तू मारलीस माझ्या मुलीला. हलकट लोक साले. पैशाचे भुके कुठले. आता काय न्यायला आलास?'' असं म्हणत मामी राणीच्या नवऱ्याच्या अंगावर धावून गेली आणि त्याची कॉलर धरून दात ओठ खात पुढे म्हणाली, ''कुठे फेडशील रे हे पाप? सोन्यासारखी पोर हो माझी. फक्त दिसायला काळी आणि कुरूप म्हणून काय वाट्टेल ते बोलायचात तुम्ही तिला. हरामखोर माणसं. काय हवंय काय आता तुम्हाला? माझ्या मुलीचा जीव घेऊन समाधान झालं नाही तुमचं? किडे पडून मराल तुम्ही सगळेच्या सगळे. अरे, पाणी नसेल तिथे तुम्हाला गाडायला हवं.''
आम्हाला कोणालाच काही सुचेना. आईनी कसंबसं मामीला बाजूला केलं. कपाळाला हात लावून बसलेल्या मामाकडे पाहून मामी आणखी चिडली आणि म्हणाली, ''काय हो, काहीतरी बोला या हरामजाद्यांना. बकोट धरा त्याचं आधी.'' मामीचा रुद्रावतार पाहून मामानी हात जोडून एकदा वर पाहिलं आणि म्हणाला, ''राधेकृष्ण... राधेकृष्ण... मनावर ताबा ठेवायला हवा सुलोचना.'' मामाच्या या सात्त्विक उत्तरावर मामी प्रचंड संतापली आणि म्हणाली, ''अहो नुसतं 'राधेकृष्ण... राधेकृष्ण' करून काय होणार आहे? तुमचा 'राधेकृष्ण' आला का आपल्या मुलीच्या मदतीला धावून? तुम्ही बसा असेच जप करीत. काही होणार नाही तुमच्याकडून.''
शेवटी मामीचा अवतार पाहून घाबरलेल्या राणिच्या नवऱ्यानं आणि सासऱ्यानं तिथून पळ काढला. जाताना सासरा मुलाला म्हणत होता, ''अरे पण आता संदीपचं काय? तक्रार केली तर या लोकांनी?'' त्यावर मुलगा तणतणला, ''संदीप जाऊ दे हो खड्ड्यात. आत्ता तरी इथून गेलेलंच बरं. नाहीतर ही म्हातारी मारायची आपल्यालाच. संदीपचं पाहू नंतर. चला.'' थोड्या वेळानी इतर लोक जमले आणि आम्ही पुढील गोष्टी उरकल्या. राणीच्या सासुरवाडचे कोणीही आले नाहीत स्मशानात. राणीला पोचवून मी आणि बाबा मामाच्या घरी आलो. इतर लोक हळू हळू परतले. आता फक्त आम्ही आणि मामा मामी एवढेच उरलो होतो. सततच्या रडण्यामुळे मामीला जराशी ग्लानी आली होती. रडून डोळेही सुजलेले दिसत होते. ती तिथेच सोफ्यावर थोडा वेळ पडली. पडल्यावर देखील मामी स्वतःशी बडबडत होती. ''सोडणार नाही त्या हरामखोर संदीपला आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला मी. नालायक निर्लज्जं कुठले.''
हे संदीप प्रकरण काही आम्हाला उलगडेना. मामा नेहमीप्रमाणे ध्यान लावून बसला होता. आई स्वयंपाकघरात थोडा चहा करीत होती. आम्ही सगळेच खूप दमलो होतो. आईनी आतून बाबांना हाक मारली. बाबा आत गेल्यावर आई म्हणाली, ''अहो, विन्याला (मामाला) जरा जागं करा. विचारा त्याला. ह्या संदीपची काय भानगड आहे नक्की. वहिनी का बडबडत्ये अशी. बास झालं म्हणावं ध्यान तुझं. मुलगी गेली तरी अजून ध्यान करतोय लेकाचा. पहिल्यापासून असाच हा. अलिप्त सगळ्यातून. माझी राणी बिचारी कितीतरी वेळा म्हणायची, 'आत्या, मी ही अशी दिसते म्हणून बाबांना आवडत नाही का? माझा यात काय दोष आहे आत्या? अगं मी एम.ए. झाले, एम. एड. केलं तरी बाबांनी माझं एका शब्दानीसुद्धा कौतुक केलं नाही कधी. इतकं महत्त्वाचं आहे का गं चांगलं दिसणं? गोरं असणं?' गेली हो शेवटी पोर.'' आईला अश्रू आवरेनात.
बाबा बाहेर आले आणि मामाचं ध्यान सुदैवानं संपलं. बाबांना पाहून मामा म्हणाला, ''या अनिलराव, बसा. राणी गेली. सुटली एकदाची. मलाही दुःख आहे. पण काय करणार आता? परमेश्वरापुढे आपलं काही चालत नाही. सगळ्याचा कर्ताधर्ता तो आहे. नुसतं मम म्हणणे हे आपलं काम. माणूस फार हतबल आहे हो. राणी तरूण वयात गेली. गतजन्मातील कुकर्म, दुसरं काय. तिच्या सासऱ्यांनी सांगितलं मला की राणीला गुप्तरोग आहे. आता तुम्हीच सांगा, हे गुप्तरोग म्हणजे गतजन्मीच्या पापाचं फळ नाही तर दुसरं काय असणार? आपल्या घराण्यात कोणालाही हे असलं काही नाही. त्यात ही दिसायला अशी काळीबेंद्री. आमचंच काही तरी चुकलं. पुढचा जन्म तरी तिला चांगला मिळो अशी इच्छा. याउपर माझे हाती काहीही नाही.'' ''राधेकृष्ण... राधेकृष्ण.. मना उठ, स्वतःला आवर घाल.'' असं बडबडत मामा आतल्या खोलीत निघून गेला.
इतका वेळ ग्लानीत असलेली मामी मामाचं हे बोलणं कानावर पडताक्षणी खडबडून जागी झाली आणि आकांडतांडव करू लागली. ती बाबांना म्हणाली, ''काही नाही हो अनिलराव, यांचा षंढपणा नडला आम्हाला. नोकरी सोडल्यापासून हे असलं चालू आहे. कधीतरी मुलीकडे लक्ष दिलं का यांनी? कायम आपलं राधेकृष्ण... राधेकृष्ण. मुलीच्या काळ्या रंगाची लोकांसमोर लाज वाटते म्हणून तिला बाहेर सुद्धा घेऊन जायचे नाहीत कधी. माझ्यात दोष म्हणून ही असली कार्टी आमावस्येला जन्माला आली असं म्हणतात नेहमी.'' मामी पुन्हा ढसाढसा रडू लागली. रडण्याचा आवेग थोडा कमी झाल्यावर म्हणाली, ''मी काय तर म्हणे श्रीकृष्णाचा अवतार! अहो कसला अवतार नि काय? थोतांड हो सगळं. डोक्याला मोराचं पिस लावून नाचतील काय, म्हाताऱ्या बायकांपासून तरण्याताठ्या पोरिंच्यात जाऊन गिरक्या काय घेतील, काय काय म्हणून सांगू तुम्हाला अनिलराव. माझी नोकरी होती म्हणून कसाबसा संसार चालला आमचा. राणीला मोठी केली. खूप छान शिकली हो राणी माझी. एम ए. झाली इंग्लिश विषय घेऊन. तुमच्यावर फ़ार विश्वास तिचा. सारखं म्हणायची, 'अनिल काकांनी सांगितलंय एम.ए.ला इंग्लिशच घ्यायचं. इंग्लिश नसेल घ्यायचं तर इकॉनॉमिक्स. हुशारी वाया जाता कामा नये.' स्वतःच्या घरी यायच्या आधी तुमच्याकडे रिझल्टचे पेढे घेऊन आली होती. आठवतंय ना?''
हे बाकी खरं होतं. बाबा राणीला वडिलांच्या जागी होते. मामाचा चमत्कारीकपणा आम्हाला सुद्धा चांगला परिचीत होता. आई चहा घेऊन बाहेर आली. वहिनीला समजावू लागली. ''जाऊ दे गं तो विन्याचा फालतू विषय आता. ही वेळ नाही त्यावर बोलायची. मला आधी सांग, ही संदीपची काय भानगड आहे? संदीप म्हणजे राणीचा दीर ना? डोक्यानी थोडा अधू आहे तोच ना तो? शिवाय गुप्तरोगाचं काय गुपित? खरं आहे हे? आणि खरं खोटं काही असू दे, पण मला एका शब्दानीही कधी बोलली नाहीस तू. राणिनंही काही उल्लेख केला नाही. काय प्रकार काय आहे हा?'' मामी काकुळतीला येऊन म्हणाली, ''वन्स, तुम्हाला खरं वाटतं हे गुप्तरोगाचं? अहो कसं शक्य आहे? आणि असं काही असतं तर राणिनं माझ्याआधी तुम्हाला सांगितलं असतं. माझ्यापेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास होता तिचा. काही म्हणजे काहीही आजार नव्हता माझ्या राणीला. हे सगळं तिच्या सासरच्यांनी उठवलंय. तिचा सासरी छळ करतात, तिला दिसण्यावरून घालून पाडून बोलतात हे तिनं बाहेर कुठे सांगू नये म्हणून तिच्या सासरच्यांनी हे असं वेडंविद्र पसरवलं सगळीकडे. लग्नाच्या वेळी परवडत नसून सुद्धा चांगले पाच लाख रुपये दिले आपण त्यांना. केवळ तुम्ही होतात म्हणून देता आले हो वन्स. तरी मागण्या काही संपल्या नाहीत या हावरटांच्या. त्यात भरीस भर म्हणजे तो नराधम संदीप. अहो अधू नि मतिमंद कुठला, चांगला व्यवस्थीत आहे तो नालायक. उगाच काहीतरी सांगतात राणिच्या सासरची मंडळी. म्हणे त्याला व्यवहारज्ञान नाही. कसलं काय? सगळं खोटं. जे ज्ञान पुरुषांना असायला हवं ते अगदी भरपूर आहे त्याच्याकडे. लिंगपिसाट कुठला.''
हे संदीप प्रकरण काहीतरी वेगळं किंवा विकृत आहे हे आता आम्हाला कळायला लागलं होतं. मामी पुढे म्हणाली, ''वन्स, पार लुटली गेली हो आपली मुलगी. हा नालायक संदीप रात्री उशीरा राणीच्या खोलीत शिरून...... शीः शीः... अहो पुढे बोलवतही नाही मला.'' आमच्या तिघांच्याही तळपायाची आग मस्तकात जाऊ लागली. बाबा तर इतके चिडले की त्याना दम लागला. त्यांना दम्याचा त्रास होता. दरदरून घाम सुटून आणि धापा टाकत बाबांनी कशीबशी दम्याची टॅबलेट हुंगली. दम कमी झाला तरी त्यांचा राग शांत होईना. मामीवर ते खेकसलेच, ''वहिनी, कमाल आहे तुमची. हे इतकं सगळं झालं आणि तुम्ही आम्हाला हे आत्ता सांगताय? शरम नाही वाटत तुम्हाला? कधी झालं हे सगळं? बोला वहिनी. कधी झालं? छे.. छे.. हे बरोबर नाही वहिनी. तुम्ही शांत कशा काय राहिलात असं झाल्यावर? मी आत्ताच जातोय त्या भिकार माणसांकडे याचा जाब विचारायला. अभ्या, चल रे तू माझ्याबरोबर.'' बाबांना मी पहिल्यांदाच इतकं रागावलेलं बघितलं. आई आणि मामी बाबांना शांत करायला पुढे सरसावल्या. त्यांना मागे दम्याचा एक सिव्हिअर ऍटॅक येऊन गेला होता. त्यामुळे त्यांना शांत करणं भाग होतं. आम्ही कसंबसं बाबांना शांत केलं.
मामीनं पुढे सांगायला सुरुवात केली. ''मला सुरुवातीला हे कळलं तेव्हा फार उशीर झाला होता वन्स. गेले सहा सात महिने किंवा जास्तही असेल कदाचित पण आपली राणी हे निमूटपणे सोशीत होती.'' ''पण का? कशासाठी?'' बाबा पुन्हा चिडून म्हणाले. मामी म्हणाली, ''तिला तिच्या नवऱ्यानं धमकावलं होतं. जर तिनं हे संदीप प्रकरण बाहेर कुठे सांगितलं तर ती आमची म्हणजे ह्यांची मुलगी नसून फक्त माझी आहे असं बाहेर सगळ्यांना सांगतील. आपल्या आईच्या अब्रूची लक्तरं ते लोक वेशीवर टांगतील म्हणून राणी बिचारी गप्प राहिली हो. एवढंच नाही तर काळ्या मुली नवऱ्याला मनासारखं सूख देऊ शकत नाहीत आणि त्यांच्याशी संबंध ठेवणारा पुरूष पापाचा धनी होऊन नरकात जातो हे राणिच्या सासरच्यांच्या कोण्या एका भोंदू गुरूजींनी सांगितलं होतं म्हणे. त्यामुळे नवऱ्यानी लग्नानंतर राणीशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवले नाहीत. तू काळी अवदसा आहेस. त्यामुळे नवऱ्याला सुख देऊ शकली नाहीस. आता निदान आमच्या वेड्या मुलाला म्हणजे संदीपला तरी तुझा काहीतरी फायदा होऊ देत, अशी तिच्या सासू सासऱ्यांनी आणि नवऱ्यानी तिला जबरदस्ती करून मानसीक त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा मला रोज फोन करून राणी सांगायची. 'आई मला घेऊन जा इथून. मी नुसती एका कोपऱ्यात पडून राहीन घरात. तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही. वाटल्यास आत्याकडे जाऊन राहीन. वन्स, तुमच्यावर फार जीव होता राणीचा. तुझीसुद्धा फार आठवण काढायची रे अभिषेक. मला म्हणाली होती. अभ्या, मी, अनिल काका आणि आत्या महाबळेश्वरला जाणार आहोत. अभ्यानी प्रॉमीस केलंय. यावेळी तो विडीयो कॅमेरा घेऊन येणार आहे. आम्ही खूप शूटींग करणार आहोत'....... '' मामी पुन्हा रडू लागली. माझ्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या. गळा भरून आला.
मला एकदम आठवलं. उन्हाळ्याच्या सुट्टीत राणी आमच्याकडे राहायला आली की ती आणि मी कितीतरी भांडायचो, मस्ती करायचो. उश्या घेऊन मारामारी करायचो. आई नेहमी मला ओरडायची. बहिणीशी भांडलास तर गाढव होशील पुढच्या जन्मी असं म्हणायची आई. असं म्हण्टल्यावर आपले इवलेसे डोळे मिचकावीत राणी खळखळून हसायची. मग बाबा आम्हाला दोघांनाही आईस्क्रीम खायला घेऊन जायचे. राणीचा नेहमी इंग्लिशमध्ये पहिला नंबर यायचा म्हणून तिला दोन स्कूप्स मिळायचे. पण एक स्कूप संपत आला की ती स्वतःहून मला उरलेलं आईस्क्रीम द्यायची. बाबा आम्हाला दोघांनाही इंग्रजी शिकवायचे. ड्रॅक्युलाच्या खूप गोष्टी सांगायचे. मी फार घाबरायचो त्यावेळी. आठ दहा वर्षाचा असेपर्यंत मला बिछाना ओला करायची सवय होती. खूप मुलं चिडवायची मला. माझे इतर भाऊ बहीण माझ्याबरोबर झोपायला तयार व्हायचे नाहीत. पण राणीनं कधीच असं केलं नाही.
सगळा अघटीत प्रकार ऐकून आईनी मामीला विचारलं, ''अगं वहिनी पण तू आम्हाला थोडं बोलली असतीस तर आम्ही कसंही करून तिला घेऊन आलो असतो. तू सांगायला हवं होतंस आम्हाला. एरवी राणीच्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आम्हाला सांगणारी तू, इतकी महत्त्वाची गोष्ट कशी काय लपवून ठेवलीस? आणि महत्त्वाचं म्हणजे तू तिला घेऊन का नाही आलीस त्या नरकवासातून?'' हताशपणे मामी म्हणाली, ''वन्स, मी सांगितलं ना तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त तिला तुम्हा लोकांची काळजी होती. तिला माहित होतं की तुम्हाला हे कळल्यावर तुम्ही नक्कीच तिला घेऊन जायला येणार. तुम्ही तिच्या घरी गेल्यावर उगाच तुमची शोभा कशाला, असा विचार करून ती काही बोलली नाही तुम्हाला. ती म्हणायची, अभ्या किंवा अनिल काकांना जर हे कळलं तर ते लगेच येतील इथे मला न्यायला. माझ्या नवऱ्याची, सासरच्यांची लायकी सुद्धा नाही त्यांच्याशी बोलण्याची. त्या लोकांनी अभ्याचा किंवा काकांचा अपमान केलेला मला सहन होणार नाही. त्यापेक्षा मलाच हे सहन करायला हवं. सुरुवातीला तिनं विरोधही खूप केला. पण संदीप डोक्यानं अधू आहे हे जगजाहीर होतं आणि दोन वर्ष तो वेड्यांच्या इस्पितळात होता हे सुद्धा सगळ्यांना माहित. तिनं बाहेर काही तक्रार केली तरी तिच्यावर विश्वास कोण ठेवणार? पोलिसांकडे जायचं म्हणजे आपली अब्रू आपणच चव्हाट्यावर मांडण्यासारखं आहे. आधिच पोर खचलेली. त्यात पोलीस तिला वाट्टेल तसे प्रश्न विचारणार. पुन्हा कोर्ट कचेरी, वकील हे सगळे खर्च आलेच. बरं एवढं सगळं करून आपल्या बाजूनं निकाल लागता तरी त्याला बरीच वर्ष जाणार. मी ही अशी रिटायर झालेली. ह्यांचं तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. मी राणीला घरी आणायला निघाले तर केवढा तमाशा केला ह्यांनी. राणी घरात आली तर मी कायमचा अरण्यात निघून जाईन. आपल्या नशिबाला लागलेलं खग्रास ग्रहण आहे ही मुलगी म्हणजे. असं अद्वातद्वा बोलून स्वतःला जाळून घ्यायला निघाला हा नाटकी माणूस. जे चाललंय ते योग्यच आहे अशी ह्यांची भावना. वर सारखं राधेकृष्ण राधेकृष्ण आहेच. पार वाट लागली आमची या 'राधेकृष्ण राधेकृष्ण' मुळे. कधी कधी मला शंका येते की हे देखील सामील आहेत राणीच्या सासरच्या लोकांत. मी राणीला घरी आणली असती तर ह्या माणसानी स्वतःच्या थोतांडाच्या नावाखाली तिचं काहीतरी बरं वाईट केलं असतं. तुमच्याकडे पाठवायला मला काहीच हरकत नव्हती. पण राणी तिथून बाहेर तर यायला हवी. तिचा धीर हळू हळू पार खचत चालला होता. घरातून बाहेर पडलो तर सासरची मंडळी आपलं काहीतरी बरं वाईट करतील नाहीतर आपल्या लोकांचं तरी बरं वाईट करतील या भ्रमात बिचारी स्वतःला खोलीत कोंडून बसून असायची.''
आई हुंदके देत रडत होती. सुन्न मनानं ती म्हणाली, ''आपली पोर हळवी होती फार. कधी कोणाचं वाकडं करण्याचा विचार सुद्धा तिच्या मनात यायचा नाही. वहिनी तुला आठवतंय का? मागे एकदा मी विन्याशी भांडले होते खूप. मी सांगितलं होतं त्याला, तुला जर इतकी लाज वाटत असेल ना मुलीच्या रुपाची तर मी आयुष्यभर सांभाळीन राणीला. घेऊन निघाले सुद्धा होते मी तिला. तू मला अडवलं नसतंस तर तेव्हाच नेलं असतं मी पोरीला. छे. माणसं किती खालच्या थराला जाऊ शकतात हे आज कळलं मला. पण वहिनी ती नेमकी गेली कशानी? म्हणजे झालं काय तिला? दवाखान्यात नेली होती का?''
मामी म्हणाली, ''नेली होती ना त्या नराधमानी. तिच्या नवऱ्यानी.'' ''का? काय झालं होतं?'' बाबांनी विचारलं. ''काय होणार? तिसऱ्यांदा गर्भपात करायला नेली होती. त्या वेड्यापासून दिवस राहिले राणिला. पहिल्या दोन्ही वेळेस गर्भपात केला. आम्हाला काहीच कळवलं नाही कोणी. राणिलाही सज्जड दम दिला होता. कळवलंस तर याद राख. आमच्याशी गाठ आहे वगैरे सांगितलं होतं. डॉक्टर तरी कसला होता तो. रस्त्यावर बसतात ना तंबू ठोकून आयुर्वेदीक जडी बूटीवाली ती माणसं, तसा होता कोणीतरी. मी त्याचा पत्ता घेऊन गाठ घ्यायला गेले तर असा कोणी माणूस अस्तित्वातच नाही असं कळलं. काय काय म्हणून पाहिलंय मागच्या काही दिवसात, वन्स किती सांगू तुम्हाला. तिच्या सासरी शेजारी राजवाडे काकू होत्या ना त्या म्हणत होत्या, अहो राणीची आई, तुमची मुलगी भ्रमिष्टासारखं करते. एकटक पाहात बसते कोणाकडे तरी. एक दिवस त्या काकुंच्या नवऱ्याला राणी म्हणाली, 'ये. तू पण ये. तूही कर तुला काय हवं ते. मी अवदसा आहे. ये ना', असं म्हण्टल्यावर राणिचं डोकं ठिकाणावर नाही आणि ती बदफैली आहे हे आजूबाजूच्या लोकांनी पसरवायला सुरुवात केली. मग पार खचली हो पोर माझी. पुढे पुढे ती त्या लिंगपिसाट वेड्याला विरोधही करेनाशी झाली. एकदा असं झाल्यावर तक्रार वगैरे करण्याचा प्रश्नच मिटला. मरतील हे लोक, किडे पडून झुरून झुरून मरतील.'' पुन्हा मामी रडायला लागली.
स्वतःला सावरत मामी पुढे म्हणाली, ''राणी जायच्या आधिच्या आठवड्यात मी गेले होते तिच्याकडे भेटायला, तिला घेऊनच यायचं आता हा निश्चय करून. अगदी व्यवस्थीत होती त्यावेळी. मी म्हण्टलं तिला, तब्येत बरी नाही का बाळ? काय होतंय तुला? त्यावर म्हणाली, 'काही नाही मी बरी आहे. आत्याची खूप आठवण येत्ये. ती मला ठेवून घेईल तिच्याकडे? मला खूप आवडेल तिच्याकडे राहायला. मी तिला फोन केला होता काही दिवसांपूर्वी. मला इथे खूप बोर होतंय इथे असं सांगितलं. पण आत्याला म्हणावं मीच येईन एक दिवस निघून. तू नको येऊस इथे आणि काकांना, अभ्याला सुद्धा नको पाठवूस. मी येईन नक्की. ही माणसं चांगली नाहीत आई. यांची नजर वाईट आहे. पण मला माहिती आहे मला त्यांची नजर लागणार नाही. मी काळी आहे ना खूप'. असं म्हणून शेवटची हसली माझी राणी. बरोबर यायला काही तयार झाली नाही. कदाचित घरी यायचीसुद्धा तिला भीतीच वाटली असेल. ह्यांची थेरं तिला माहितीच होती. आणखी काही अघटीत, बिभत्स, विकृत घडून मला त्रास होऊ नये असं वाटत होतं तिला. खिन्न मनानं मला घरी यावं लागलं. पण चुकलंच. जशीच्या तशी आणली असती घरी तर वाचली असती पोर.'' मामी मोठ्यानं गळा काढून रडत होती.
'मी काळी आहे ना खूप' हे ऐकून मी, आई आणि बाबा तिघेही गहिवरलो. आम्हाला तो प्रसंग आठवला. एकदा आमच्याकडे आईची एक मैत्रिण आली होती. त्यावेळी राणी आमच्याकडे राहायला आली होती. ती त्या मैत्रीणीसाठी चहा घेऊन गेली. त्या वेळी मैत्रीण म्हणाली, ''काय ग हे? चांगले चार पाच लक्स, हमाम, डव का काय ते साबण घासून टाक चेहऱ्यावर. थोडी चकाकशील. हा... हा.... हा..'' त्यावर आईनी राणीकडे पाहिलं तर तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. मैत्रिण घरी गेल्यावर आई राणीला शोधत आतल्या खोलीत आली आणि पाहिलं तर राणी बाथरूम मध्ये जाऊन चेह्ऱ्यावर लक्स घासत होती. आईनं तिला बाहेर आणली आणि म्हणाली, ''अगं वेडे, हे असे साबण घासून जर माणसं गोरी झाली तर बघायला नको. मूर्ख मुलगी. त्या बाईचं काय मनावर घेतेस तू. एक गोष्ट लक्षात ठेव, तूला कधीच कोणाचीही नजर लागणार नाही. नजर लागू नये म्हणून काळा रंग लावतात कि नाही? मग. तुला गरज नाही असले काळे आणि कुठलेही रंग लावण्याची. तू जशी आहेस तशी आमची आहेस आणि आमचीच राहणार आहेस.'' त्या दिवशी राणी मनसोक्त रडली होती.
सगळ्या गोष्टी कळेपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. आता तर राणी कायमची सोडून गेली होती. रंगानं खूप काळी असल्यामुळे लग्न लवकर नं जमणं, बराच काळ गेल्यावर एका विदुर माणसाशी लग्न करण्याचा घेतलेला निर्णय या सगळ्या गोष्टी राणीनं त्यामानानं फारच लवकर स्विकारल्या होत्या. आपण रंगानी खूप काळे आहोत, दिसायला विद्रूप आहोत त्यामुळे कुठेतरी आपल्याला तडजोड ही करावीच लागणार हे जणू काही तिनं मनात धरलंच होतं. तरीसुद्धा आपलं लग्न जमलं या नुसत्या विचारानंच ती खूप सुखावली होती. तिला बिचारीला काय कल्पना की पुढे हे असं सगळं वाढून ठेवलेलं असणार. स्थळाची व्यवस्थीत चौकशीसुद्धा केली होती. पण आता माणसांमध्ये नक्की कुठल्या प्रकारची विकृती असेल हे अनुभव आल्याशिवाय कसं कळणार? याला नशीब म्हणायचं, राणिचा भित्रेपणा म्हणायचा की आपली निवड चुकली, अजून चौकशी करायला हवी होती असं म्हणून स्वतःला दोष द्यायचा, काहीच कळेना. विषण्ण मनस्थितीत आम्ही बसलो होतो. पहाटेचे साडेपाच सहा वाजायला आले होते. रात्रभर मामा सोडल्यास कोणालाही झोप लागली नाही.
सकाळी सहा साडेसहाच्या सुमारास अचानक गाणं किंवा भजन काहितरी ऐकू आलं. मामाच्या खोलीतून आवाज येत होता. भजन चालू होतं. ''कृष्ण माझी माता.. कृष्ण माझा पिता.. बहिण बंधू चुलता.... आ आ आ आ.......'' गाणं चालू असतानाच मामा हॉलमध्ये आला. डोक्यावर मोराचं पीस लावलेलं. हातात खेळण्यातली बासरी. फक्त लाल पितांबर नेसलेला उघडबंब मामा गिरक्या घेत घेत नाचत हॉलमध्ये घिरट्या घालत होता. मध्येच दुसरं गाणं लागलं. ''गोपाळकृष्ण राधेकृष्ण...... गोपाळकृष्ण राधेकृष्ण....'' या गाण्याच्या तालावर मामा नाचत नाचत मामीकडे गेला आणि त्यानं मामीला मिठी मारली. आधीच संतापलेल्या मामीनं मामाला ढकलून दूर केला. मामा तसाच धडपडत आणि नाचत नाचत आईकडे आला. आई मामाच्या समोर ताठ उभी होती. मामा जवळ येताच आईनी त्याचा हात घट्ट धरला आणि सणसणीत त्याच्या थोबाडीत दिली. मामाचा डावा गाल आणि कानशिलं लालेलाल झाली. थोबाडीत बसताच मामा खाली बसला आणि ढसा ढसा रडू लागला. आई त्याच्याकडे रागानी बघून म्हणाली, ''अरे नीच माणसा, बास झालं तुझं थोतांड. मुलीचा जीव घेणारी कसली भक्ती ही? पुन्हा आयुष्यात मला तोंड दाखवू नकोस. चल गं सुलू. हे घर आणि हा माणूस, या दोघांचीही एवढी लायकी नाही की तू इथे राहवंस. चल इथून.''
मामी एखाद्या यंत्रमानवासारखी आमच्याबरोबर निघाली. आम्ही घरी जात होतो. आईला सारखा दोन आठवड्यापूर्वी आलेला राणीचा फोन आणि तिचे त्यावेळचे शब्द आठवत होते. 'आत्या मला तुझ्याकडे यायचंय गं. इथे खूप बोर होतंय. येऊ ना मी आत्या?...........'