गोड लिंबू लोणचे

लग्नानंतर आयायटीत वसतिगृहात राहिल्या लागल्यापासून जी काही छोटी मोठी सुट्टी मिळत असे तेव्हा आमची धाव नेहमी पुण्याकडेच असायची. माझी मोठी मामी त्यावेळेला दादरला राहायची तिच्याकडे अधुनमधुन जायचो. ती नेहमी म्हणायची एकदा ये माझ्याकडे राहायला नेहमी पुण्याला पळत असतेच.

मामीकडे राहण्याचा योग लवकरच जुळून आला. विनायकला काही कामानिमित्ताने बाहेरगावी जायचे होते. विचार केला यावेळेला मामीकडे जाऊया. तिच्याकडे राहायला गेले आणि तिला म्हणाले मामी मला लिंबू लोणचे शिकवशील का? म्हणजे नेहमीचे नाही हं. गोड लिंबू लोणचे, मला ते खूप आवडते. म्हणाली मी तुला करूनच देते. १५ लिंबांचे करून देते. करताना बघ म्हणजे पुढच्यावेळी तू लोणचे घालशील तेव्हा सोपे जाईल. हे लोणचे तर खूपच सोपे असते. त्याकरता तुला दोन काचेच्या बरण्या लागतील त्या घेऊ आधी आपण आणि अजून आहेस ना ५-६ दिवस तेव्हा सावकाशीने घालू.

बाजारात लिंबांसाठी व बरण्यांसाठी फेरफटके मारले. बरण्या छानच मिळाल्या. चॉकलेटी रंगाच्या आणि त्याला लाल झाकण. जाड काचेच्या पारदर्शक ठेंगण्याठुसक्या बरण्या खूप छान दिसत होत्या. बरण्या घरी आल्यापासून आम्ही दोघींनी बरण्यांचे खूप कौतुक चालवले होते. कमी किमतीत किती छान मिळाल्या ना! आकाराने पण वेगळ्याच आहेत, रंग पण नेहमीसारखा नाही, खूप वेगळा आणि छान! लिंबांकरता परत दुसऱ्या दिवशी भाजीमार्केटमध्ये फिरलो. इकडे बघ, तिकडे बघ, कितीला दिली लिंबे? खूप महाग आहेत. मामी भाजीवाल्यांकडचे लिंबू बघून वास घ्यायची, हाताने दाबून बघायची. मी खूप वैतागले होते. एक तर दादरला नेहमी गर्दी असते. एवढी काय चिकित्सा!  मला तर कधी एकदा लिंबू कोणचे घालून खाते असे झाले होते! परत तिसऱ्या दिवशी आमच्या दोघींचे फेरफटके बाजारात! मला म्हणाली अगं लिंबू पण नीट बघून घ्यावी लागतात. खूप मोठी नकोत, लहानही नकोत. लिंबाचे साल पण पातळ हवे. शेवटी मामीला हवी तशी लिंबे मिळाली.

घरी आल्यावर जेवलो. दुपारचा चहा प्यायला मग लोणच्याला सुरवात. लिंबे धुऊन घेतली. ती कोरड्या फडक्याने पुसली. विळी धुऊन घेतली ती पण कोरड्या फडक्याने पुसली. बरण्या आधीच धुऊन पुसून तयार होत्या. लिंबू सुद्धा चिरण्याची एक पद्धत आहे. उभे नाही चिरायचे, आडवे चिरायचे. मला तर त्यावेळेला उभे आडवे काहीच कळले नाही! लिंबे चिरताना पण त्यावर दाब द्यायचा नाही, हलक्या हाताने चिरायची. त्यात लाल तिखट व मीठपण नेहमीचे मिसळण्याच्या डब्यातले घालायचे नाही कारण की हे उपवासाचे  लोणचे असते. पूर्वी लाल तिखट वर्षाचे घालून ठेवलेले असायचे त्यातले लागेल तेवढेच लाल तिखट काढून ठेवले होते मामीने. मीठ पण उपवासाला वेगळे म्हणून ठेवलेले त्यातलेच वापरले. साखर व जिरेपावडर घातली.

लोणचे कालवले व बरण्यांत भरले. रात्रीच्या जेवणाला म्हणाले घ्यायचे का लोणचे ह्यातले. मामी म्हणाली अगं थांब मुरू देत जरा थोडेसे! दुसऱ्या दिवशी लोणच्याच्या खाराची चव बघितली. मामी किती छान झालंय गं लोणचे! मामी म्हणाली झालाय ना छान. आवडले ना तुला. आवडले म्हणजे काय मस्तच झाले आहे. मी नेहमी घालणार आता हे लोणचे. मला खूप आवडते. दोन दिवसांनी घरी आल्यावर आम्ही दोघांनी लोणचे खाण्याचा जो सपाटा लावला की खार संपून लोणच्याच्या फोडीच शिल्लक राहिल्या. त्याही मुरल्यावर मस्त लागल्या.

त्यानंतर मी हे लोणचे कधी घातलेच नाही. लिंबाच्या लोणच्याचा मुहूर्त बरेच वर्षानंतर इथे अमेरिकेत आल्यावर लागला. भारतात असताना आई तर दरवर्षी नवीन लोणचे घातल्यावर जुने मुरलेले आम्हा दोघी बहिणींना द्यायची, मग मुद्दामून कोण घालतंय लोणचे! इथे सुद्धा दोनदाच घातले गेले. परत एकदा घालायचे आहे. दर वेळेला लिंबे आणते आणि घोकत राहते घालायचे घालायचे म्हणून, शेवटी ती अशीच पोहे उपम्यांवर पिळून संपतात!