सैंयो माही विछड गयो मेरा

नस्रत फ़तेह अली खान यांचे हे गाणे मनामध्ये रुतून बसले आहे. त्यांच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय गाण्यांमधले हे नसावे कदाचित, कारण त्यावरची रसग्रहणे किंवा संदर्भ फारसे वाचनात आलेले नाहीत. (कदाचित वाचनच तोकडे असेल.)

खोल घळीमधून कोलोरॅडो वाहात राहावी एखाद्या पुसट रेषेसारखी, तसे हे गाणे मनात कुठेतरी खोल अंधुक स्रवत असते. का, ते सांगता येणार नाही. झंकार हा शब्द सुचला होता. पण हा झंकार नव्हे. त्यासाठी तार छेडावी किंवा छेडली जावी लागणे आवश्यक असते. पण इथे तर संतत, निरंतर, अनाहत असा हा नाद सुरू असतो. 'झिणी झिणी बाजे बीन' सारखी अवस्था होऊन जाते. अर्थात 'झिणी झिणी' शी 'सैंय्यो माही' चे कुठल्याच बाबतीत साधर्म्य नाही. 'सैंय्यो माही' हे उघड उघड एक विरहगीत आहे. फार तर त्याला आपण सूफी तत्त्वज्ञानाची डूब देऊ शकू. किंवा तशी ती असेलही.

पण मनात रुतून बसण्याचे ते कारण नव्हे. रुतून बसलेला हा सल आहे. उपटून काढून फेकताना सुद्धा वेदना आणि अस्तित्व तर ममत्वाची संवेदना. निर्मम होणे जमत नाही. 

हे कशामुळे होत असेल? नस्रत फतेह अलींचे स्वर, समूहाच्या टाळ्यांचा नाद की पंजाबी-सरायकी चे आपलेसे वाटणारे शब्द? की सुरुवातीची एक धून जी नंतरही आवर्तित होत रहाते? टाळ्यांचे मात्र एक आहे. त्या वाजायला लागल्या की ब्रह्मानंदी टाळी लागतेच. 'ना तो कारवां की तलाश' ऐकताना सुद्धा असेच होते. पण इथे तलाश तरी आहे. 'सैंयो माही विछड गयो मेरा, किसेदी नज़र लग गयी' मध्ये काय आहे? एक गाऱ्हाणे फक्त.

कुणाला ही अतिशयोक्ती वाटेल़़. उदात्तीकरण वाटेल.कोलोरॅडो ची उपमा अस्थानी असमर्पक वाटेल. वाळवंटातून वाहाणारी कोलोरॅडो सुद्धा अशीच मनात खोल रुतून बसली आहे. त्याला कोण काय करणार?