तो क्षणच इतका सुंदर होता
तू भेटलीस त्या संध्याकाळी
किती वाजले होते आणि किती वाटले होते
काहीच आठवत नाही.
मी शर्ट इन केला होता किंवा नव्हता,
रुमाल घाम पुसायला सोबत होता किंवा नव्हता,
तुझा फुलाफुलांचा पंजाबी ड्रेस निळा होता की आकाशी
तुझे काळेभोर केस किती मोकळे होते
तू गोरी होतीस की निमगोरी
तू सुंदर होतीस की तुझी नाकीडोळी नीटस
काहीच आठवत नाही.
तू छान म्हटलेली इडली मी खाल्ली की सोडून दिली,
आणि चहा घेताघेता तुझ्या सौम्य,मृदू आवाजाने
"तुला मराठी नाटकं फारशी आवडत नाही,
आश्चर्य आहे," असं म्हटल्यावर
मी माझे संवाद कसे विसरलो,
हेही आठवत नाही.
एवढे मात्र स्मरते मला लख्ख एका क्षणी
त्या रेस्टराँटच्या मंद पिवळ्या आकाशात
तुझ्याइतके सुंदर दुसरे कुणीही नाही असे मला वाटले होते की
तो क्षणच इतका सुंदर होता .
चित्तरंजन