डॉक्टर जगो..

डॉक्टरलोक पेशंटला नेहमीच कापतात, पैशांत मापतात किंवा टाळूवरचं लोणी
चापतात... असे अनेक गैरसमज जनमाणसांत पसरलेले असतील. परंतु डॉक्टरांची कथा
अन् व्यथा निराळीच आहे.
मूळात हा व्यवसाय/ पेशा रांत्रंदिन युद्धाचा प्रसंग असा असतो. डोळ्यात तेल
घालून रुग्ण तपासणे, योग्य निदान करणे, उपचार पुरवणे हे काही सोपे काम
नाहीये मित्रांनो.
पेशंटचा आजार वा पिडा कशी दूर करता येईल याच विचारांत डॉक्टर गढलेले असतात.
रुग्ण बरा झाल्याशिवाय बिल घेतले जात नाही किंबहुना तसे उद्दिष्ट
त्यांच्यापुढे मुळीच नसते.
समाजसेवा अन् सेवाभाव डॉक्टरकीत दडलेला असला तरी मेवा लाटणारे लुटारू
डॉक्टरही आढळतात. वस्तुतः कुठलीही सेवा मेव्यासाठीच योजिली असल्याचा आभास
लुटारूंच्या अंतरी वास करून असतो. म्हणूनच तिथे भ्रष्टाचाराशी सहवास सुरु
होतो.
पूर्वीपेक्षा वैद्यकिय क्षेत्र फार प्रगत झालेय. नव नव्या संशोधनांनी
परिपूर्ण होऊ लागलेय. नाविण्याची नवी चिकित्सा साधने उपलब्ध झाल्यामुळे
आजाराच्या मूळापर्यँतचा प्रवास स्क्रिनवर सहजपणे पाहता येऊ लागलाय. अर्थात
'आमच्या अद्ययावत ज्ञानाचा उपयोग खर्चिक असल्याने तो तुम्ही पेलवलाच
पाहिजे' अशी लालसा डॉक्टरीपेशात मूळ धरतांना आढळते.
कितीही किस काढला तरी मोरपिस हाती न लागता खराटाच अंगावरून फिरेल अशी
परिस्थिती आहे. चांगल्या सेवाभावी व्रतस्थांना विसरायचं अन् वाईट
वागणाऱ्‍यांची खुलेआम चर्चासत्रे भरवायची ही तर समाजाची वृत्ती.
चांगलं सोडून देऊन वाईटाला कुरवाळायचं अशी ही प्रवृत्ती. वृत्ती काय किंवा
प्रवृत्ती काय एकदा का बोकाळली की चित्ती समाधान उरत नाही. म्हणूनच
कोणत्याही पेशाकडे, व्यक्तिकडे आपण कोणत्या नजरेने पाहतो त्यावर सर्व काही
अवलंबून आहे.
वैद्यकीय व्यवसाय अगोदर सेवेचं व्रत असतं मागाहून अर्थार्जनाचा पेशा ठरतो.
हे लक्षात घेऊन अगणितांचे प्राण कंठाबाहेर पडू न देणाऱ्‍या डॉक्टरांना
आदरार्थी शुभेच्छा द्यायलाच हव्यात. नाही का?