सभ्यतेची अभिरूची : नागपुरी तडका

सभ्यतेची अभिरूची : नागपुरी तडका
छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं  ...... !!
चॅनल पाहावं कोणतंय तं उघडेबंब नाचते
टीव्ही पाह्यतांना पोरासंग, मायबाप लाजते
सभ्यतेची अभिरूची लईच दिसते न्यारी
अब्रू गेली ढोड्यात अन नोट झाली प्यारी
आता उघडं काय, झाकलं काय, सारखंच झालं 
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं  ...... !!
जलश्यातल्या पोरी कशा टगरबगर पाहे
चार लोकामंधी मात्र झाकूनझुकून राहे
जे काही करे ते अंधारात करे
उजेडात मात्र इज्जतीले मरे
आता उजेड काय, अंधार काय, सारखंच झालं 
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं  ...... !!
कालेजचे तोतामैना वर्गात नाय दिसत
आडमार्गी झाडाखाली बसते दात किसत
जनाची लाज ना मनाले खंत
खुलेआम प्रेमलीला, नाही त्याले अंत
आता दिवस काय, रात्र काय, सारखंच झालं 
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं  ...... !!
शायण्याने बगीच्यात जाऊ नये म्हणतात
बिनावार्‍यानं झुडपं तिथं, खल-खल हालतात
झुडपाच्या आडोशाला दोन पाखरं बसते
"प्रेम" या शब्दाचे धिंडवडे नुसते
आता भय काय, अभय काय, सारखंच झालं 
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं  ...... !!
                      गंगाधर मुटे
------------....--------------....----------...------------
..ही कविता ऐकण्यासाठी क्लिक करा/भेट द्या..
------------....--------------....----------...------------