मी जरा धास्तावलो

सोवळे ना पाळले मी सद्गुणावर   भाळलो
कर्मकाण्डाला बघूनी मी जरा धास्तावलो

हम करेसो कायदा ही धर्म व्याख्या जाहली
तालिबानी नाच नंगा पाहता पाणावलो

चार बाबा   मॉलवींना हक्क तो कोणी दिला ?
फैसले ऐकून त्यांचे मी जरा चक्रावलो

धर्म कोणी जाणला का ? अर्थ कोणा समजला ?
पाहता त्यांच्या लढाया अंतरी रक्ताळलो

स्त्रीस देवी मानती अन स्त्री भ्रुणाला मारती
कोंडती बुरख्यात का हे मी कधी ना समजलो

प्रेम अथवा लग्न करण्या का हव्या पंचायती ?
मूग गिळती राज्यकर्ते मी मनी चॉताळलो

नरबळी हुंडाबळीने  रान का ना पेटले ?
षंढ या वस्तीत मी ही शांत आहे झोपलो

वाघ वाघाशी न भांडे धर्म नाही त्या जगी
जन्म घेउन माणसाचा मी आहे पस्तावलो

शायराला राग इतका शोभतो "निशिकांत"का ?
कागदाचा वाघ आहे मीच मज ना भावलो

निशिकांत देशपांडे   मों. न. ९८९०७ ९९०२
E Mail: nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतीक्षा