एकला दारी उभा मी वृक्ष, फांद्या वाळलेल्या
वेदना गत आठवांच्या अंतरी साकाळलेल्या
कैक पक्षांचा, पिलांचा राबता तो सांजवेळी
आजही कानात घुमती किलबिली त्या ऐकलेल्या
गात होत्या कोकिळाही आड पानांच्या दडूनी
विव्हळते मन आठवूनी मैफिली त्या रंगलेल्या
ऊन रखरख झेलले मी सावली देण्या जगाला
त्या जगा कळती न माझ्या भावना हेलावलेल्या
पान नाही फूल नाही मी कफल्लक आज आहे
सावल्या सुर्यास्त होता पाहिल्या ना थांबलेल्या
भैरवी रागात गातो गीत अस्ताचे सुखाने
मज समाधी, ऐकताना मीच ताना छेडलेल्या
वाटते माझ्या असावी रात्र काळोखी उशाला
ना दिसो जगतास माझ्या पापण्या ओलावलेल्या
वाटते कहूर यावे उन्मळून खाली पडावे
बाद मृत्यूच्या बघू दे वेदना मम संपलेल्या
पूस ते "निशिकांत" डोळे ईश पाठीशी तुझ्या रे !
"श्री" कसा विसरेल वेड्या चार दुर्वा वाहिलेल्यी
निशिकांत देशपांडे मो. न. ९८९०७ ९९०२३
E Mail :-- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची अपेक्षा