आकाशी मी ऊंच उडावे तुझियासंगे
क्षितिजा पुढचे विश्व बघावे तुझियासंगे
रजई शिवली ठिगळांची पण त्यातच मजला
ऊब मिळावी, स्वप्न पडावे तुझियासंगे
घरटे माझे, अंगण माझे आज खरे पण
माझे सारे "अपुले" व्हावे तुझियासंगे
विश्व फुलांचे अन गंधाचे आज गवसले
पुलकित व्हावे, गंधाळावे तुझियासंगे
रंग गुलाबी आयुष्याचे इतके दिसती
हिंदोळ्यावर मस्त झुलावे तुझियासंगे
प्रेमाची ना ओळख मजला, शब्दा जुळवुन
गीत लिहावे, झंकारावे तुझियासंगे
आवडत्या रागांची नावे पुसती मजला
रागावरती प्रेम नसावे तुझियासंगे
दूर असावी मंजिल इतकी जाता जाता
सूर्य शशी मार्गात दिसावे तुझियासंगे @@
तूच उतरसी गजलांमधुनी "निशिकांता"च्या
मतला, मक्ता, शेर लोहावे तुझियासाठी
@@ टीप :-- खूप दिवसापूर्वी मुशायऱ्यात ऐकलेल्या एका उर्दु शेरावरून.
निशिकांत देशपांडे मो.नं. :-- ९८९०७ ९९०२३
E Mail :-- दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा