जरा ओळखू या

पुन्हा आठवांना चला जागवू या
जुन्याला नव्याने जरा ओळखू या

कशाला हवे पंचपक्वान्न खाण्या ?
भुकेशीच दोस्ती पुन्हा वाढवू या

करू यत्न का पाप झाकावयाचा ?
जनाला खरा चेहरा दाखवू या

झडे पर्णराजी उगा का रडावे ?
नवे पान फुटता जरा थरथरू या

नका वाजवू तुणतुणे संस्कृतीचे
किती ऱ्हास झाला जगाचा बघू या

घडायास क्रांती निखारे हवे ना !
उठा रान सारे चला पेटवू या

भविष्यात दिसते नको तेच तर मग
स्मृतीचीच पाने पुन्हा चाळवू या

जरी आज मी खूप घायाळ आहे
शिकाऱ्यास थोडी दया दाखवू या

खरा प्रश्न "निशिकांत", देण्यास छाया
किती वृक्ष राजी? जरा पारखू या

निशिकांत देशपांडे मो न. ९८९०७ ९९०२३
E Mail :-- दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा