काय बहाणे व्यर्थ हुडकता ? (मक्ताबंद गज़ल)

मक्ताबंद गज़ल या प्रकारात प्रत्येक शेरात शायराचे नाव येते.

काय बहाणे व्यर्थ हुडकता हसण्यासाठी ?
"निशिकांता"चे हास्य पुरूनी उरण्यासाठी

झोप उडाली "निशिकांता"ची प्रश्न किती ते !
एकच डुलकी यावी स्वप्ने दिसण्यासाठी

प्रेम उमलता, मस्त कलंदर "निशिकांता"चे
डोळे होती ओले कोणी पुसण्यासाठी

पाश कधी का तोडुन तुटती ? "निशिकांता" मग
गोफ कशाला विणला नाती जुळण्यासाठी ?

आनंदाचे वेष्टन आहे पांघरले मी
दु:ख जन्मले "निशिकांता"चे लपण्यासाठी

काय जगी जगण्याला आहे "निशिकांता"रे
श्वास रुकेना काय करू मी? मरण्यासाठी

भार नसावा कोणावरती "निशिकांता"चा
खोद कबर तू अपुल्या प्रेता पुरण्यासाठी

पोकळ उत्सव साज घराचा "निशिकांता"च्या
जे न घरी ते आहे लोका पटण्यासाठी

"निशिकांता"ला दान मिळाले एकांताचे
गज़लांना मी फुलवत असतो रमण्यासाठी

निशिकांत देशपांडे मो.नं. ९८९०७ ९९०२३
E Mail दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा