कशास रुजली फिरून आशा?



कशास रुजली फिरून आशा मनात माझ्या जगावयाची?
असून पांगुळ बुलंद इच्छा हवी कशाला उडावयाची?

जरी जुना मी, जुन्यात रमणे नकोनकोसे मलाच वाटे
मला प्रतिक्षा, हवीहवीशी नवीन स्वप्ने पडावयाची

करून झाली नवीन व्याख्या सुखात जगणे कसे असावे
तुझ्या सुखास्तव निरांजनासम हवी तयारी जळावयाची

पुरे पुरे हे टुकार जगणे उजेड मजला नको अता पण
दिव्यास आज्ञा कुणी करावी? जगात माझ्या विझावयाची

स्मशानभूमीत काष्ट विकणे असेल पेशा जया कुणाचा
जगावया तो करी प्रतिक्षा कुणी उद्याला मरावयाची

विकून देशा कुठे निघाले अकांड तांडव करीत नेते?
सलाम त्यांना झुकून करणे परंपरा मी जपावयाची

तपास करण्या लवाद बसले तरी खुशीतच लबाड कोल्हे
लवाद म्हणजे विशेष संधी उसात त्यांना लपावयाची

खिशात दमडी कधीच नव्हती तरी कलंदर बनून जगलो
उदास वारा तयात नव्हती मजाल मजला शिवावयाची

विकार "निशिकांत"ला जडावा दवात ओल्या कळ्या फुलांचा
पहाट आता कवेत घ्यावी मनात उर्मी भिजावयाची


निशिकांत देशपांडे   मों. नं.  ९८९०७ ९९०२३

E Mail:- nishides1944@yahoo.com

प्रतिसादाची अपेक्षा