कशाने तरी हो कुणावर रुसे मी
जगे मी; परी
जीवनावर रुसे मी ।ध्रु।
मला शत्रुची ओढ आहे कदाचित१
नि मित्रांसवे तेढ आहे कदाचित२
अशा मित्रता-भांडणांवर रुसे मी ।१।
जगे मी; परी
जीवनावर रुसे मी
कळेना कुणाच्याकडे पाहतो मी
परी ज्या कुणाच्याकडे पाहतो मी३
तया वाटते त्या कुणावर रुसे मी ।२।
जगे मी; परी
जीवनावर रुसे मी
न जागृत४ असे मी, न मी सुप्त आहे
मनातील तिमिरात मी लुप्त आहे
कुणा इंदुच्या५ चांदण्यावर६ रुसे मी ।३।
जगे मी; परी
जीवनावर रुसे मी
१ पर्याय : मला शत्रुचे वेड आहे कदाचित (वेड - तेढ हे यमक मस्त जुळेल पण अर्थासाठी ओढ बरे वाटले)
२. ह्या दोन ओळी मूळ गाण्यात उलट्या क्रमाने आहेत. मित्र आधी शत्रू नंतर.
३. नेमक्या अर्थाने
कळेना कधी मी कुणाला पहातो
परी ज्या क्षणी ज्या कुणाला पहातो .. असे होईल पण कानाला वरील ओळी बऱ्या वाटल्या
४. सुप्त, लुप्त, तिमिर, इंदु ह्या बाकी शब्दांच्या वजनाप्रमाणे येथे 'जागृत' असे बरे वाटले. पण 'जागा' हे सोपे वाटेल. वृत्तात दोन्ही बसतात.
५. इंदु म्हणजे चंद्र. वृत्तात बसणारा इतर शब्द असल्यास सुचवावा.
६. नावर किंवा णावर अशा यमकाप्रमाणे येथे शब्द सुचला नाही. अर्थात आवर असे यमक धरले तर हा शब्दही बसतो. पर्याय सुचत असल्यास सुचवावा.
टीपा :
हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.
चाल : मूळ गाण्याचीच! (लगागा लगागा लगागा लगागा) (भुजंगप्रयात... मनाच्या श्लोकांचे वृत्त )(मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल
)
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)
३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ... नावर लगा गा किंवा ... णावर लगा गा असे जमवा. यमकांची जागा ठळक केलेली आहे.