वय स्वप्नांचे

कळू लागले जेव्हा मज आशय स्वप्नांचे
कळू लागले, सरले आहे वय स्वप्नांचे

कुठून आणू धुंदी आता तरुणपणाची?
बंद कधीचे पडले मदिरालय स्वप्नांचे

एक जातसे पूर्णत्वाला, लाख भंगती
काय करावे मोल अशा मृण्मय स्वप्नांचे?

निद्रिस्तांच्या दिग्विजयाची दौड रात्रभर
बळी दिले जातात पहाटे हय स्वप्नांचे

संकल्पांची होळी होता बांध तोडुनी
पूर वाहती डोळ्यांतुन जलमय स्वप्नांचे

प्रखर वास्तवाचा भास्कर माथ्यावर आहे
मेणाच्या पंखांना वाटे भय स्वप्नांचे

ऑथेल्लो मी, मीच इयागो, डेस्डिमना ती
किती अकारण घ्यावे मी संशय स्वप्नांचे

अमूर्त असते शैली स्वप्नांच्या चित्रांची
अपूर्ण उरते मनोमनी वाड्.मय स्वप्नांचे