घुमटातुनि आकाशीच्या...
घुमटातुनि आकाशीच्या
हुंकारत जातो वारा
झुंडीतुन कृष्णघनांच्या
बिजलीचा लख्ख पिसारा
आलापी पाऊस वेडा
द्रुतगतीने तोच तराणा
कडकडली थाप मृदुंगी
मेघांचा घुमड घनाना
अंधार जरी गपगार
टपटपती चुकार थेंब
सांभाळत ओटीपोटी
रसरसते हिरवे कोंभ
बहुरुपे तेज प्रकटते
घुमटातुन आकाशीच्या
रंगात गंध मिसळले
रसमयी वसुंधरेच्या...