गझल
सारा हिशोब द्यावा लागेल एक दिवशी!
त्याचीच चूक त्याला समजेल एक दिवशी!!
चिखलात माखल्याने दिसतो तुला असा तो....
आहे अरे हिरा तो, चमकेल एक दिवशी!
वाया मुळीच माझे जाणार रक्त नाही;
येथेच स्वप्न माझे उगवेल एक दिवशी!
आहे अशाचसाठी दारी तुझ्या उभा मी....
ते आज ना उद्याला उघडेल एक दिवशी!
माझी गझल उद्याला गाजेल एवढी की,
होऊन श्वास हृदयी धडकेल एक दिवशी!
आधी विचार कर, मग दे आहुती मला तू!
ही आग त्यामुळे पण भडकेल एक दिवशी!!
इतकी नको स्मृतींची देऊस ऊब मजला!
ही काच काळजाची तडकेल एक दिवशी!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१