जीवनगाणे - २

डोरोथी क्रोफूट हॉजकिन: DOROTHY CROWFOOT HODGKIN.  प्रोटीन क्रिस्टलोग्राफीची (Protein Crystallography) जननी. जन्म: कैरो, इजिप्त येथे १२ मे, १९१०. मृत्यू शिप्स्टन ऑन स्टूर, इंग्लंड इथे २९ जुलै १९९४ रोजी. सामान्यतः शास्त्रीय चरित्रकारांना उत्तम चारित्र्य आणि सखोल विज्ञान यात फारसा परस्परसंबंध आढळत नाही. अर्थात यालाही काही अपवाद आहेतच. चार्ल्स डार्विन हा प्रेमळ, उत्तम सांघिक शास्त्रज्ञ, कुटुंबासाठी वाहून घेतलेला पिता, तरूण सहकार्‍यांचा आधार, प्रांजळ, प्रामाणिक आणि अजातशत्रु असा शास्त्रज्ञ होता अशी इतिहासकार त्याची मुक्त कंठाने स्तुती करतात, डोरोथीला नक्कीच अशा अर्थाने आधुनिक युगातली डार्विन म्हणता येईल. तिच्या सहकाऱ्यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर "ती एक थोर रसायनशास्त्रज्ञा, संत म्हणता येईल अशी व्यक्ती, प्रेमळ, लोकप्रिय, मृदुस्वभावी आणि सहिष्णु वृत्तीची आणि विश्वशांतीची प्रणेती होती."असे हेमोग्लोबीनच्या अणूचा शोध लावणारे विख्यात नोबेलविजेते शास्त्रज्ञ मॅक्स पेरूट्झ म्हणतात. विज्ञानक्षेत्रातल्या तिच्या योगदानाचा आणि विश्वशांततेसाठी तिने केलेल्या अथक कार्याचा आढावा थोडक्यात घेणे केवळ अशक्य आहे.

सूक्षमदर्शकामुळे सजीव पेशींच्या अध्ययनाचे एक दालनच कसे उघडले ते आपण मागील लेखांकात पाहिले आहे. या दृश्य प्रकाशीय उपकरणाच्या शोधाला नंतर अवरक्त किरण, क्ष किरण वगैरे इतर प्रारणांच्या इंटरफीअरन्स, डीफ्रॅक्शन इ. गुणधर्मांवर चालणार्‍या उपकरणांचे धुमारे फुटले. विज्ञानातल्या डोरोथीच्या योगदानाकडे आता वळतो. प्रथिन स्फटीकचित्रणविज्ञान अर्थात प्रोटीन क्रिस्टलोग्राफी या विषयाचा पाया तिने घातला. इ.स. १९३४ मध्ये आपले मार्गदर्शक गुरू जे. डी. बर्नल यांच्या साथीने तिने सर्वात प्रथम जैव पदार्थाच्या स्फटीकाच्या ‘क्ष-किरण डीफ्रॅक्शन’ पद्धतीने छायाचित्रणाला पेप्सिनच्या रेणूपासून सुरुवात केली.

आता क्ष किरण स्फटीकवेधाविषयी म्हणजे ‘एक्सरे क्रिस्टलोग्राफी’विषयी. प्रकाश सामान्यतः सरळ रेषेत प्रवास करतो. एखाद्या स्फटीकातून किरण गेले की किरणांच्या मार्गात बदल होतो. (इथे किरण ही संज्ञा प्रारणांचा झोत अशा व्यापक अर्थाने वापरली आहे. फक्त दृश्य किरणांचा झोत अशा मर्यादित अर्थाने नव्हे) हा बदल त्या स्फटीकाचे विशिष्ट किरणांनी छायाचित्र घेऊन नोंदवता येतो. क्लिष्टता टाळण्यासाठी जास्त तपशिलात जात नाही. या बदलावरून त्या स्फटीकाची अणुरचना समजण्यास मदत होते. क्ष किरण वापरून जर एखाद्या स्फटीकाच्या अणूचे छायाचित्र घेऊन त्या अणुरचनेचा अभ्यास केला तर त्या अभ्यासाच्या शास्त्राला ‘एक्स रे क्रिस्टलोग्राफी’ म्हणतात.या स्फटीकचित्रण पद्धतीने तिने कोलेस्टेरॉल, लॅक्टोग्लोब्यूलीन, फेरिटीन, टोबॅको मोझॅईक व्हायरस (TMV), पेनिसिलीन, B-12 जीवनसत्त्व आणि इन्शुलीन (इन्शुलीनची रचना शोधायला ३४ वर्षे लागली) या पदार्थांची अणुरचना शोधून तर काढलीच, वर क्ष-किरण तीव्रता मोजण्याची व नोंदण्याची पद्धतही शोधून काढली. बर्नल यांच्या मार्गदर्शनाखाली काम पूर्ण केल्यानंतर तिने ऑक्सफर्ड इथे स्वतःची प्रयोगशाळा काढली. या प्रयोगशाळेतील आनंदी, उत्फुल्ल आणि उत्साहवर्धक वातावरणाबद्दल तिच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तिथल्या आठवणीत भरभरून लिहिले आहे.

हाती घेतलेली कामे प्रचंडच होती. कारण दर वेळी हाती घेतलेल्या प्रथिन रेणूचा आकार हा उपलब्ध तंत्राच्या आवाक्याबाहेरचा असे आणि दर वेळी हातातला प्रथिन रेणू नवनव्या वेगळ्या, वैशिष्ट्यपूर्ण अशा  समस्या उपस्थित करीत असे. १९४७ साली पेनिसिलीनची अणुरचना प्रसिद्ध केल्यावर तिला रॉयल सोसायटीच्या सदस्यत्वाचा बहुमान प्राप्त झाला तर B-12 म्हणजे सायनोकोबालअमाईनची अणुरचना तिने प्रसिद्ध केल्यावर १९६४ साली तिला नोबेल पारितोषिकाने गौरवले गेले. इन्शुलीनची रचना तिने ३४ वर्षे झगडल्यानंतर १९६९ साली शोधून काढली. १९८८ साली तिने अत्याधुनिक असे संगणकीय तंत्र शोधून काढले आणि प्रथिनाची रचना शोधून काढायचे क्लिष्ट काम आता काही वर्षांऐवजी काही महिन्यात किंवा काही आठवड्यात करता येऊ लागले. अशा तऱ्हेने क्ष किरण डीफ्रॅक्शन पद्धतीने केलेल्या स्फटीकवेधाच्या - क्रिस्टलोग्राफीच्या सहाय्याने क्लिष्ट रचना असलेल्या रेणूची रेण्वीय रचना शोधून काढण्याचे तंत्र तिने अनेक सुधारणा करून विकसित केले. तिचे नाव न घेता क्रिस्टलोग्राफीविषयी बोलणे शक्य होणार नाही एवढे उत्तुंग असे तिचे क्रिस्टलोग्राफीतले कार्य आहे.

वडील जॉन आणि आई ग्रेस क्रोफूट या दांपत्याच्या चार मुलींपैकी हॉजकीन ही सर्वात मोठी. वडील शिक्षण मंत्रालयातर्फे कैरोमध्ये पुरावस्तुशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत तर आई थोर कलावंत. कॉप्टीक टेक्स्टाईल (प्राचीन इजिप्शियन वस्त्रेप्रावरणे) मधील कसबी कलावंत. १९३७ साली आफ्रिकी संस्कृती विषयातील तज्ञ थॉमस हॉजकीन यांच्याशी तिचा विवाह झाला. त्यांना तीन अपत्ये झाली. वडिलांचा संशोधनवृत्तीचा आणि आईचा कौशल्याचा, कसबाचा, कलाज्ञानाचा वारसा तिला मिळाला.

शास्त्रीय धोरण आणि विदेशनीती या क्षेत्रातली डोरोथीची भूमिका ही सदैव तिच्या संशोधनाला पूरक अशी राहिली. विश्वशांतीसाठी केलेल्या सार्वजनिक कार्यामुळे तिच्या संपूर्ण कुटुंबाला तीस वर्षांपेक्षा जास्त काळ समाजाकडून मानमरातब आणि आदर मिळाला. अनेक आंतरराष्ट्रीय शांतिसंघटनांची ती सदस्या होती. शीतयुद्धातल्या प्रतिबंधामुळे १९९० पर्यंत तिला अमेरिकेचा व्हिसा मिळाला नव्हता. वय ८०च्या पुढे गेले, संधिवाताच्या दुखण्याने विकलांग झाली तरी देखील अमेरिकेत जाऊन इन्शुलीन, क्रिस्टलोग्राफी आणि क्रिस्टलोग्राफीची भविष्यातील वाटचाल या विषयावर अमेरिकन संस्थांमध्ये चर्चा करण्याची संधी साधायला मात्र तिने अजिबात वेळ दवडला नाही आणि अमेरिकेचा एक संस्मरणीय दौरा केला. दौऱ्यावरच्या प्रत्येक ठिकाणी गर्दीमुळे standing-room-only श्रोतृवृंद असे. (सभागृहातील सर्व खुर्च्या/आसने पूर्ण भरली की फक्त उभे राहून व्याख्यान ऐकण्यासाठी पाश्चिमात्य देशात तेव्हा कमी दराने तिकिटे विकली जात तेव्हा त्या श्रोतृवृंदाला ‘स्टॅंडींग रूम ओन्ली ऑडिअन्स’ असा शब्दप्रयोग केला जात असे). १९९४ साली आपल्या वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी मेंदूच्या रक्तपुरवठ्यात अडथळा आल्यामुळे तिचे प्राणोत्क्रमण झाले.

क्रमशः