गावोगावी
प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक आवडी-निवडी असतातच (चूक अथवा बरोबर) मतेही असतात. हा तर लोकशाहीतील व्यक्तिस्वातंत्र्याने, प्रत्येकाला दिलेला जन्मसिद्ध अधिकारच आहे. आवडी-निवडी हा व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो, असेही म्हणतात, असेलही ---पण एकमात्रं नक्की, की कुणाची आवड निवड, मते इतरांपेक्षा वेगळी आहे, म्हणून ती व्यक्ती वाईट आहे, असे समजणे सुज्ञ, सुजाणपणाचे लक्षण नव्हे. सारे काही माझ्यासारखेच, माझ्या मताप्रमाणे असले पाहिजे, हा अट्टहास सोडून, दुसऱ्याच्या आवडी निवडी आणि मतांचा आदर करणे, करता येणे, हे सभ्य, सुसंस्कृत आणि प्रगल्भ मनाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. प्रवासामध्ये याचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते.
आपल्या ओळखीच्या, सवयीच्या परिघातून (म्हणजेच comfort zone मधून) बाहेर आल्यावर लक्षात येते, की आपल्या अनुभवांच्या पल्याडही एक मोठे विश्व आहे. ते सुद्धा तितकेच मनोहारी, तितकेच प्रत्ययकारी आणि तितकेच जीवनरसाने परिपूर्ण असे आहे.
आम्हाला दार्जिलिंगला जायचे होते. खूपच मोठा पल्ला होता. आधी पुण्याहून मुंबई नंतर कलकत्ता, कलकत्त्याहून जलपाईगुडी, आणि नंतर तिथल्या लहानशा ट्रेनने दार्जिलिंग, असा प्रवास होता. जलपाईगुडीमध्ये पोहोचल्यावर तिथले अपरंपार निसर्ग सौदर्य बघून थकवा कुठेच नाहीसा झाला होता. तिथल्या लहानशा आटोपशीर स्टेशनमध्ये एकच ट्रेन, अगदी खेळण्यातली असावी तशीच. पुण्याच्या पेशवेबागेतली फुलराणी आहे ना, तिचीच जरा मोठी बहीण शोभावी अशी. डोंगर रांगांमधून जाणारा वळणावळणाचा रस्ता, डोळ्याचे पारणे फिटेल अशी हिरवाई आणि अतिशय थंड हवा असे एकंदरीत वातावरण होते. दार्जिलिंगमध्ये सरळ, सपाट असे रस्ते नाहीतच. अरुंद, थोडे पुढे गेले की पटकन वळण घेणारे, आणि चढ उतार असलेले रस्ते. गर्दीसुद्धा तुरळकच. त्यातही पर्यटकांची संख्या खूपच जास्ती. अंधार लवकर होत असे. त्यामुळे संध्याकाळचे पाच, साडेपाच वाजले, की रात्र झाली असेच वाटायचे. हवा अत्यंत थंड होती. हातमोजे, पायमोजे, स्कार्फ, स्वेटर, शाल इतका जामानिमा देखिल अपुरा आहे असेच वाटत होते. आपल्याकडे रिक्षास्टॅंडवर रिक्षांची रांग असते, तशी तिथे जीप अथवा व्हॅन्स ची रांग असे. कुठेही जायचे असले की जीप व्यतिरिक्त दुसरा पर्यायच नाही.
आणि नवखे प्रवासी म्हटल्यावर अव्वाच्या सव्वा पैसे मागणार. एकंदरीत कुठल्याही पर्यटन क्षेत्री असते, तसेच सगळे काही. इथे तर भाषेचा सुद्धा प्रश्न. त्यामुळे तिथली भाषा जाणणाऱ्या एखाद्या गाईडची मदत घेणे अपरिहार्य.
संध्याकाळी अंधार पडायला लागला होता. पण नवीन शहर बघायची उत्सुकता होती. मग पायीच जायचे ठरवले. अतिशय थंडी आणि अंधार झालेला होता. आमच्या राहण्याच्या जागेसमोरच एक खूप उतार असलेला रस्ता होता. अक्षरशः डोंगर उतरल्या सारखे वाटत होते. तो रस्ता जिथे संपला तिथे एका बाजूला एक जुजबी बाजार होता. तिथे लोकरीच्या शाली, स्वेटर्स, ब्लँकेटस वगैरे होते. इतरही अनेक कलाकुसरीच्या वस्तू होत्या. तो उतार असलेला रस्ता जिथे संपत होता, तिथे रस्त्याच्या कठड्याला लागूनच, उजवीकडे एक विक्रेता उभा होता. एका लहान मेजावर एक मोठे पातेले, आणि काही डबे असा सरंजाम होता. आम्ही तसेच पुढे गेलो. थोडेफार चालून परत माघारी वाटचाल सुरू केली. कारण शहर अनोळखी, माणसे आणि त्यांची भाषापण अनोळखी. परत त्याच रस्त्यापाशी पोहोचलो. आता आम्हाला तो रस्ता चढून जायचा होता. कठड्याजवळ तो विक्रेता अजूनही होताच. म्हटलं, बघूयात काय विकतो आहे? तो चक्क पाणीपुरीवाला होता. पाणीपुरी हा काही अगदी फार अप्रुपाचा असा पदार्थ नव्हे. पण दार्जिलिंग मध्ये पाणीपुरी दिसणे नक्कीच अपेक्षित नव्हते.
त्याच्याकडच्या पुऱ्या अगदीच लहान होत्या. पाणी पण काही वेगळेच होते, अगदी आईसकोल्ड म्हणावे असे. तिथल्या अतिथंड वातावरणामुळे असेल कदाचित. जरा तिखट आणि आंबट होते. पण चव खूपच वेगळी. त्या थंडीत, अंधारलेल्या रस्त्यावरची ती थंडगार पाणीपुरी अजूनही आठवते. अनोळखी जागी, ओळखीचे काही दिसले, की ते कायमचे स्मरणात राहतेच.
कोसबाडचा रस्ता असाच स्मरणात राहिला आहे. संपूर्ण रस्ताभर गुलमोहोराची झाडे. सारी लाल, पिवळ्या, केशरी रंगांच्या फुलांनी बहरलेली. कोसबाड ला जरासे उंचावरचे घर होते. घर म्हणजे लागून लागून असलेल्या खोल्या, समोर व्हरांडा आणि मग पायऱ्या. पायऱ्या उतरून गेले, की सर्व मातीचाच रस्ता होता, पलीकडे दाट झाडी असलेला. तिथे शहरी सुविधांचा पूर्ण अभाव होता. वावरणारी माणसे सुद्धा अशिक्षित, म्हणजे अगदी अक्षरशत्रूच. पण त्यामुळे त्यांचे काहीच अडत नसे. कारण व्यवहारज्ञान अगदी पक्के.
तिथे भरपूर ताडीची झाडे होती. नारळाच्या, किंवा सुपारीच्या झाडांसारखीच दिसणारी, परंतु उंच आणि लवचीक. नारळाच्या झाडांपेक्षा जरा सडपातळ बुंधे असलेली. तिथल्या बऱ्याच लोकांचा मुख्य व्यवसाय ताडी विक्रीचाच. झाडाला फळे धरली की त्याला मातीचे मडके बांधायचे. ती फळे पिकली की मडकी उतरवायची. हे सर्व काम करणारे, झाडांवर लीलया चढत किंवा उतरत. कुठलीही साधने, अथवा कुणाचीही मदत न घेता.
तिथे सगळी दारे कायम उघडीच असत, कुणाचीच दारे कधीच बंद नसत. त्या परिसरात, दुसरे कुठलेही पक्के, दारे खिडक्या असलेले घरही नव्हते. जेवण अगदी साधेच असे. कसलीतरी पालेभाजी, भाकरी किंवा पोळी. एकदा तर चक्क शेपूची भाजी होती.
तिथे एक बाई काही कामासाठी आलेली. गुडघ्यापर्यंत पोहोचणारे घट्ट, दुटांगी नेसण. रंग काळा आणि अगदी काटक. केसांचा घट्ट अंबाडा घातलेला. व्हरांड्याच्या लाकडी खांबाजवळ बसली होती. काय बोलत होती माहिती नाही. आणि बोलता बोलता, कमरेला खोचलेली चंची काढली की तिने. मी थक्क होऊन पाहत होते. तिला तसे वागणे सरावाचेच होते. तिथले सारेचजण, तसेच वागत. बायका सुद्धा भरपूर कष्टाची कामे करीत असत. पण शिक्षण काहीच नाही.
अशा या दुर्गम भागात सुधारणा घडवून आणण्याकरिता, श्रीमती अनुताई वाघ यांनी फार मोठे कार्य उभे केले आहे. अशा निःस्वार्थीपणे अहोरात्र समाजकार्य करणाऱ्या, तळमळीच्या समाजसेविकेचे जीवन खरोखर प्रेरणादायी आहे.
समाजसेवेवरून आठवले -- राष्ट्रीय सेवा योजनेचे रहिवासी शिबिर होते, खेड या गावी. पुणे-अहमद नगर रस्त्यावरील खेड.
सात आठ दिवसांचे शिबिर होते ते. मोकळ्या माळावर राहायचे. शिबिरातील इतर कार्यक्रमाबरोबरच, सर्व वैयक्तिक कामे देखिल करायची... घरी असताना जी कामे आमच्यासाठी इतर कुणी करत असत, ती सर्व कामे तिथे आम्हाला करायला लागत.
शहरी मुलामुलींना कार्यानुभव मिळावा म्हणून असेल कदाचित.
स्वैपाक करायला गावातल्या काही बायका येत. आम्ही त्यांच्या मदतनीस. आलटून पालटून त्यांना स्वैपाकाला मदत करायची. त्या जे आणि जसे सांगतील ते करायचे. तशा त्या आम्हाला अगदीच वरवरची कामे सांगत. आमच्यापैकी कुणालाच फारसा स्वैपाक करता येत नसे त्यावेळी. त्या बायकांना त्याचे फार नवल वाटे. कारण त्यांच्या घरातील दहा बारा वर्षांच्या मुली झाडलोट करणे, पाणी भरणे, धाकट्या भावंडांना सांभाळणे इ. कामे नित्यनेमाने करीत असत. कधी वेळ पडली तर झुणका भाकरी देखील करीत असत. आणि या मुलींना स्वैपाक येत नाही म्हणजे काय?
आम्हाला म्हणायच्या, "पोरींनो तुमाला स्वैपाक येत नाही, मग कसं व्हायच? नवरा, सासू काय म्हनल? "
"म्हणून तर इथं पाठवलंय ना शिकायला.. ", आम्ही गमतीने म्हणायचो. त्या पण हसायच्या.
तिथे जमिनीत जरा खोल खणून, त्यात वाळक्या काटक्या, लाकडे टाकलेली असत. जाळ पूर्ण पेटेपर्यंत नुसता धूर होई. एकदा चांगला जाळ झाला, की त्या खड्ड्याच्याच तोंडावर, मोठी पातेली, तवे ठेवून त्या स्वयंपाक करीत असत. तवे चांगले मोठाले. त्यांची पोळपाटे पण मोठी असत. एकेक पोळी केव्हढीतरी मोट्ठी. पोळ्यासुद्धा अगदी मोजून-मापून केल्यासारख्या, एकसारख्या, मऊसूत आणि गोल. बोलता बोलता, चांगल्या ढीगभर पोळ्या करीत.. आम्ही मुली पोळ्या भाजायचे काम करीत असू. पण नुसत्या हाताने तव्यावरची पोळी काही उलटता यायची नाही. मग त्या उलथणी द्यायच्या आणि म्हणायच्या, " अशा कशा तुमी? " पोळी भाजून झाली, की तव्यावरून उतरवायच्या आधी त्यावर थोडे तेल टाकून, वरून अलगद चमचा फिरवीत. त्याचा असा खमंग वास सुटे की बास...
माझी आई पोळीला तूप लावत असे. पण ही तेलपोळी सुद्धा चांगली चवदार असे.
जवळच्याच गावात (आता नाव आठवत नाहीये), एके ठिकाणी खवा बनवीत असत. मोठाली खोलगट अशी भांडी होती. त्यात एखादा लहान खांबच वाटावा अशा उंचीचा डाव होता. खाली चूल पेटलेली. आणि त्या पातेल्यात खवा बनत होता. त्यांनी सांगितले, की तो पूर्ण होईपर्यंत सतत ढवळत राहावे लागे. नाहीतर पातेल्याच्या तळाशी लागला, म्हणजे करपला तर सगळीच मेहनत वाया आणि वर नुकसानसुद्धा. असा तयार झालेला खवा ते आजूबाजूच्या बऱ्याच ठिकाणी पुरवत असत. अत्यंत कष्टाचे काम आहे ते.
असे सगळे प्रासंगिक अनुभव जमा होत जातात. त्याची एक सुंदर मालिकाच तयार होते. स्वगृहाबाहेर आल्यावर, एका निराळ्याच, विशाल अशा जगाची ओळख होत जाते. आपल्या मनावरची रीती-रिवाज, सवयी, कल्पना इ. ची साचलेली जळमटे झटकली, की एका लखलखीत विश्वाचे दर्शन घडते. त्या विश्वाचे आपण एक घटक असतोच, परंतु प्रेक्षकही असतो. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, त्यामुळे त्यांच्या अनुभूती देखील निरनिराळ्या असतात. त्यामुळे घटना, प्रसंगांचे प्रत्येकाने लावलेले अन्वयार्थ सुद्धा वेगळेच असतात. म्हणूनच तर एकाच घटनेचे, प्रसंगाचे अनेकांना, अनेक अर्थ गवसतात. प्रसंगा प्रसंगाने अनेकांच्या ओळखी होतात. पुढे कालौघात त्यांची नावे, चेहरे विस्मरणातही जातात. परंतु त्या त्या घटना, प्रसंगांच्या चौकटीतील त्यांचे स्थान मात्र अबाधित असते.
समृद्धी फक्त साधने आणि संपत्तीच्याच स्वरूपात मोजली जाते असं नाही. आपल्या स्मरण कप्प्यात जपलेले विविधरंगी क्षण, जीवन समृद्ध करतात. वेळोवेळी लाभलेले असे अमोलिक सोनेरी क्षण हीच खरी, कधीही क्षय न होणारी संपत्ती आहे असेच मला वाटते.
(क्रमशः)