उद्या रक्षाबंधन आहे त्यासाठी सर्व मनोगतींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने माझ्या आईने केलेली एक कविता येथे देत आहे. आईने ही कविता १७ वर्षांपूर्वी केलेली आहे, पण मला वाटतं की आजच्या काळातही ती औचित्यपूर्ण वाटेल.
रक्षाबंधन
रक्षाबंधन आज करूया जरा रूढीवेगळे
मानवतेचे बंध ज्यामधे सगळे सामावले -१-
बहीण भाऊ पवित्र नाते आज कुठे उरले
कर्मवती अन् हुमायूनही इतिहासी विरले -२-
अत्याचारा सीमा नाही ना नाते गोते
प्रेमभावना मानवताही दडली का कोठे -३-
परस्परांचे रक्षण करण्या संघटीत व्हावे
प्रेमाचे ते नाजुक धागे मनास बांधावे -४-
बहीण भाऊ संकुचित हा अर्थ नसो याला
विश्वबंधु हे एकच नाते नवा अर्थ याला -५-
रक्षाबंधन नाही केवळ या दिवसापुरते
मानवतेच्या विश्वासावर जग सारे जगते -६-
राष्ट्रएकता सूत्रच राखी बंधन राखीचे
असले रक्षाबंधन करु दे रक्षण राष्ट्राचे -७-
---- प्रभावती ब्रह्मे