"समीर, उठ लवकर, प्रॅक्टीकल आहे केमेस्ट्रीचं...ऊठ लवकर" योग्या माझ्या कानाजवळ केकाटत होता. मी तसा जागाच होतो. म्हणजे झोपच लागली नव्हती रात्रभर. दुसऱ्या दिवशी प्रॅक्टीकल म्हटल्यावर मला आदल्या दिवशी झोपच लागत नसे. कशी लागणार? प्रॅक्टीकलला नेमकी माझ्यासोबत एक मुलगी असायची. त्यातही ती होती कुडी पंजाबन - उंच, गोरीपान, तगडी असं तिचं व्यक्तिमत्त्व होतं. आणि सगळ्यात मोठ्ठा प्रॉब्लेम म्हणजे ती फाड-फाड इंग्रजी बोलायची. दुसरा डोक्याला ताप म्हणजे ती कायम जीन्स आणि टी-शर्ट मध्ये यायची. आता अशी मुलगी जर इतक्या तंग कपड्यांमध्ये येऊन तुमच्यासोबत २ तास प्रॅक्टीकल करणार असेल तर काय डोंबलं लक्ष लागणार आहे त्या प्रॅक्टीकलमध्ये! २ तासात मी अक्षरशः नेस्तनाबूत होऊन जात असे.
"यार, योग्या, आपण प्रॅक्टीकल्स सोबत करत जाऊ नं! ती पोरगी खूप ताप देते डोक्याला. सतराशे साठ प्रश्न विचारते आणि मध्येच खळाळून हसते."
"बरं, ठीक आहे. आज बोल तू मॅडमशी. मला काही प्रॉब्लेम नाही."
म्हटलं आजच्या दिवस तिच्यासोबत करून टाकू प्रॅक्टीकल आणि मॅडमशी बोलूनच टाकू. हे रोजचं मरण कोण मरेल? तयार होऊन आम्ही निघालो कॉलेजला. मी आता थोडा सुधारलो होतो. म्हणजे स्लीपरच्या जागी आता चपला आल्या होत्या आणि शर्ट पँटच्या आत खोचलेला होता. पण त्यालाच 'शर्ट-इन' म्हणतात असं मी ठामपणे म्हणू शकत नाही. बाकी मुलं लोटोचे वगैरे शूज घालून यायचे. त्यावेळेस लोटो आणि वूडलँड्स ही बुटांची प्रसिद्ध नावे होती. पहिल्यांदा लोटोचं नाव ऐकल्यावर मला ते मराठी 'लोटणे' या क्रियापदाचे हिंदी रूप म्हणूनच लक्षात राहिले होते. म्हणजे "मेरेको उंच कडेसे लोटो, मै मर जाना चाहती हूं... " वगैरे! मजल-दरमजल करत आम्ही कॉलेजला पोहोचलो. मी धडधडत्या अंतःकरणाने प्रयोगशाळेत दाखल झालो. उंदरासारखा लपत-छपत माझ्या टेबलकडे गेलो. मनातल्या मनात माझा देवाचा धावा सुरू होता. "हे ईश्वरा, तिला आज किंचित ताप येऊ दे, किंवा येताना तिच्या गाडीचं चाक पंक्चर होऊ दे." पण तसं काही झालं नाही. ५-१० मिनिटात ती दात काढत, उड्या मारत आणि दुरूनच मला हात दाखवत माझ्याजवळ येऊन ठेपली.
"हाय समीर. गुड मॉर्निंग"
"गुड मॉर्निंग"
"हाऊ आर यू?"
" आय ऍम फाईन, थँक्यू!" मी हळू - हळू सुधरत होतो. काही दिवसात इतकी प्रगती म्हणजे कौतुकास्पद होती नाही का? घर्मबिंदू हळू-हळू कपाळावर कब्जा करत होते. दिल की धडकन तेज होत चालली होती. आणि अशा बेसावध क्षणी तिने हल्ला केला.
"हाऊ वॉज युवर इविनिंग यस्टरडे?"
"इट वॉज ओके. आय वॉज ऍट होस्टेल."
"ओ माईन वॉज ग्रेट."
"ओके"
"............ " तिने बरचं काही बाही सांगीतलं. तिच्या प्रत्येक वाक्याला माझं एकच उत्तर होतं "ओके"! तिला प्रतिप्रश्न करण्याचं धैर्य माझ्याजवळ नव्हतं. कारण प्रतिप्रश्न म्हणजे उत्तरं आणि उत्तरं म्हणजे आणखी उपप्रश्न, त्यापेक्षा नकोच ती भानगड. आणि प्रतिप्रश्न करणार तरी कसे? इंग्रजीमध्ये? येडं बिडं लागलायं का? मराठीतच विचारतांना अडखळायला होतं आणि इंग्रजीमध्ये विचारायचे म्हणजे...
"वुई विल गो टू कँटीन अँड हॅव एक्स्प्रेसो कॉफी"
"ओके" अरे ओके काय ओके? पुन्हा अर्धा तास तिच्यासोबत बसायचं, तिला झेलायचं, सोपं आहे का? आणि बिल कोण देणार? एव्हढा वेळ तिच्याशी काय बोलायचं? मी पण एक मूर्खच आहे. गंमत अशी होती की तिला नाही कसं सांगायचं हा महान अवघड असा प्रश्न होता. काहीतरी कारण तर सांगायलाच लागलं असतं. मी मनातल्या मनात जुळवा-जुळव करतच होतो.
"नो. ऍक्चुअली, लेक्चर इज देअर, आफ्टर धिस प्रॅक्टीकल... " वगैरे मी आठवत होतो पण तेव्हढ्या वेळात तोंडातून सट्कन 'ओके' निघून गेलं. आता झाली का पंचाईत! आलीया भोगासी असावे सादर! मी निघालो तिच्या मागोमाग, बावळटासारखा. तेव्हढ्यात योग्या दिसला. मी म्हटलं " प्लीज वेट हं, आय विल कम. योग्या इज माय फ्रेंड. आय वर्क विथ हिम."
"व्हॉट, यू वर्क विथ हिम?"
"नो नो, काम है उसके साथ."
"ओके. मेक इट फास्ट."
"आय ऍम नॉट मेकिंग एनिथिंग."
" आय नो, कम फास्ट" ती हसली.
मी योग्याजवळ गेलो. म्हणालो, " योग्या, तू पण चल ना, मी एकटा काय करू? तू तिच्याशी बोलू तरी शकशील. तुझ्याकडे लोटोचे बूट आहेत. माझाकडे काय आहे?" मला एकदम योग्या दीवार स्टाईलमध्ये मला विचारतोय " मेरे पास जीन्स हैं, लोटो के शूज हैं, नीले-पीले टी-शर्टस हैं... क्या है तुम्हारे पास?" असं वाटायला लागलं.
"मेरे पास कुडी पंजाबन हैं!" मी पण काय कमी शशी कपूर नव्हतो!
"ये चल ना यार, काय भाव खातोस." तो अर्थातच नाही म्हणला. मग मी निमूटपणे तिच्या मागून निघालो. तसं मी योग्याला कँटीनला दुसऱ्या टेबलवर बसायला सांगीतलं होतं. बचावासाठी बरा!
आमची वरात कँटीनला आली. तिथं काय या बाईच्या मनात आले, ती मला कॉलेजबाहेरच्या एका हॉटेलमध्ये घेऊन गेली. मला प्रश्न पडला की हे योग्याला कसे कळवावे. तो आमच्या मागे होताच. त्याला मी डोळ्यांनीच खूण करून आमच्या मागे यायला सांगीतलं. हॉटेल तसं बरचं महाग दिसत होतं. मला एक्स्प्रेसो कॉफी म्हणजे काय हा गहन प्रश्न पडला होता. साधी कॉफी माहित होती. त्या काळसर वड्यांपासून बनवलेली कॉफी मी बऱ्याचदा प्यालो होतो, पण ही काय नवीन भानगड होती हे बघण्याची उत्सुकता नक्कीच होती. आम्ही एका टेबलावर बसलो. वेटर आला. तिने माझ्याकडे बघितले.
"एक्स्प्रेसो कॉफी?"
"या, एक्स्प्रेसो विल डू."
खळाळून हसत "इट'स एस्प्रेसो... espresso, not expresso!" असं ती एक एक अक्षर म्हणून मला समजावून सांगत होती. असं आहे होय. बघू या तरी कशी लागते ही कॉफी.
तिने वेटरला २ एस्प्रेसो कॉफी सांगीतली. माझ्याकडे बघून म्हणाली, " सो समीर, व्हेअर आर यू फ्रॉम?"
"जलगांव" एका वाक्यात उत्तरे द्या सारखं माझं एका शब्दात उत्तरे देण्याचा सपाटा चालला होता. मागच्या टेबलावर योग्या बसला होता. फिदीफिदी दात काढत होता.
वेटर कॉफी घेऊन आला. मी डोळे ताणून बघत होतो. वर बराच फेस आणि आत कॉफी असावी असा मी अंदाज बांधला. मी कधीतरी कोल्ड कॉफी विषयी ऐकले होते. साधी कॉफी सोडून बाकी सगळ्या कॉफ्या या कोल्ड कॉफ्या असतात असा माझा घट्ट गैरसमज होता. काहीही विचार न करता मी धाडकन वेटरला विचारले,
"स्ट्रॉ?" इथे वेटरशी मराठीत बोलावे की हिंदी मध्ये हा प्रश्नच मी निकालात काढला होता. कोल्ड कॉफी फक्त स्ट्रॉनेच प्यायची असते हा दुसरा गैरसमज! वेटरला हसावे की रडावे तेच कळत नव्हते. माझ्यासमोर बसलेली पोरगी मात्र खदाखदा हसत होती.
"धिस इज हॉट कॉफी, समीर. व्हाय डू यू वाँट अ स्ट्रॉ?"
मी कसंनुसा हसलो आणि कॉफीचा मग हातात घेतला. अबब, केव्हढा मोठा मग होता तो. पहिला घोट घेतला न घेतला तोच माझं लक्ष समोर योग्याकडे गेलं. तो मला बघून वाकुल्या दाखवत होता आणि त्याने त्याक्षणी पेपर नॅपकीनचा एक बोळा माझ्याकडे भिरकावला. तो बोळा माझ्या नाकावर सटकन आदळला. तोंडात गरम कॉफीचा घोट, हातात एव्हढा मोठ्ठा कॉफीचा मग, नाकाच्या शेंड्यावर आदळलेला कागदाचा बोळा आणि समोर जीवघेणी गज़ल बसलेली, त्यात अव्ह्याहतपणे माझ्या कानावर आदळणारे इंग्रजी प्रश्न, मी पुरता बावरलो आणि जो नही होना था वही हो गया... मगातली कॉफी हेंदकाळत मगातून सर्रकन बाहेर पडली आणि सरळ तिच्या टी-शर्टवर आणि माझ्या शर्टवर सांडली. बोंबला, आता हे काय नवीनच? मी दहावेळा 'सॉरी' म्हटले आणि चटकन पेल्यातले पाणी हातात घेऊन पुढे सरसावलो. माझा पाण्याने भरलेला हात वेगाने तिच्या टी-शर्टकडे झेपावला. अक्कल गहाणच पडली होती तेंव्हा. योग्या पोट धरून-धरून हसत होता. तेव्हढ्यात माझे मलाच लक्षात आले आणि मी निमूटपणे जागेवर बसलो. आता पाण्याने ते धुऊन टाक नाहीतर डाग पडतील हे तिला इंग्रजीमध्ये कसे सांगावे असा प्रश्न पडला. मी आयडीया केली. मी माझ्या शर्टावर डाग पडलेल्या ठिकाणी पाणी लावले आणि बेशरमपणे तिला म्हणालो,
"डू धिस... ऑदरवाईज ... दाग नही निकलेगा!"