वेडे स्वप्न !

धडधडत्या श्वासांचे फडफडते धुंद थवे
अवघडल्या गात्रांतून उलगडते कंप नवे

दरवळत्या स्पर्शाचे परिमळते मोह-कळे
मोहरत्या मदनाचे जडावले नेत्र निळे

सरसरत्या काट्याचे शिरशिरते दव अंगी
भरभर ते पूर असे झरझरते शतरंगी

खळबळल्या एकांती सळसळती प्रणयलहर
काजळल्या रात्रीतून ओघळला मदिरप्रहर

विरघळत्या भानातच चुरगळती लाज हसे
मनकवड्या प्रीतीचे तन-वेडे स्वप्न पिसे !

- वेदश्री.