ह्यासोबत
टिम डेव्हिसचा काटा दूर केल्यावर पीटरला मिळालेल्या अधिकाराबरोबरच (मुख्य डिझाइनर) त्याच्यावर जबाबदारी ही येते. आतापर्यंत इतरांची कामं करून/ केल्याचं भासवून फक्त कौतुक करून घ्यायची सवय लागलेल्या, थोडक्यात टोप्या घालण्याचं काम करणाऱ्या पीटरला फ्रँकनने एका लहानशा घराचा आराखडा करण्याचं काम पीटरला सोपवतो. कुठलीही जबाबदारी न घेता, काही निर्माण करण्याचा अनुभव नसलेल्या पीटरच्या अंगाला दरदरून घाम फुटतो. त्याला जगाचा (आपल्याकडून अशा अपेक्षा ठेवल्याचा) राग येतो. पण करणार काय? पीटरला नामुष्की, तीही आपल्या साहेबाकडून कदापि मान्य नाही. घराचा प्रकल्प अगदीच लहानसा होता, तरीही आपल्याला हे जमणार नाही हे ठाऊक असल्याने त्याची अधिकच चरफड होते.
म्हणून मग ह्या समस्येच्या समाधानासाठी तो हमखास असा मार्ग धरतो... रोर्कच्या घराचा!
रोर्कच्या इमारतीचे पाच मजले चढताना, तेही पायी, पीटरला त्या वातावरणाची, गरीबीची घृणा येते. आणि त्याहूनही स्वतःची, कि त्याला रोर्कचे पाय धरावे लागताहेत ह्याची. स्वतःच्या यशाची, समाजातल्या स्थानाची कवचं नेहमीच रोर्कपुढे गळून पडतात ह्याची त्याला जाणीव होती, आणि एका ख्यातनाम स्थापत्यविशारद कार्यालयातील मुख्य डिझाइनर एका समाजाच्या खिजगणतीतही नसणाऱ्या, "अयशस्वी" व्यक्तीकडे मदत मागायला जातो ही नामुष्की त्याला जाळत असते. अर्थात, त्यामुळे तो परावृत्त होतो अशातला भाग नाही...
रोर्क कडे जाऊन पदर पसरून तो म्हणतो मला तुझ्या मदतीची, खरं तर केवळ पाठिंब्याची गरज आहे. मला ह्या कामात तू मदत कर, मला आत्मविश्वास येईल. आणि घराचा आराखडा त्याला दाखवतो. तो पाहून रोर्क अचंबित होतो... चोऱ्यामाऱ्या करून बनवलेल्या त्या आराखड्याला हसावं का रडावं असा त्याचा चेहरा होतो. ते पाहून पीटर त्याला परत विनंती करतो, कि माझी लाज राखण्यासाठी तरी तू मला मदत कर.
रोर्कला कामाशी मतलब असतो, त्यामुळे तो पीटरला मदत करतो, आणि त्याच्या आराखड्यावर सुधारणा करतो... जवळपास पीटरचा आराखडा कचऱ्याच्या डब्यातच टाकतो. आणि त्याच्या आत्मविश्वासाने भरलेल्या, सरळ, ठळक आरेखनाकडे पाहून पीटर अजूनच अस्वस्थ होतो. रोर्क पाहता पाहता पीटरच्या आराखड्यातले दोष निपटून काढून एक सुबकसा, रेखीव आरखडा तयार करतो... ते पाहून पीटर म्हणतो ह्यात जर ग्रीक/ रोमन पद्धत असली तर गिऱ्हाईकाला जास्त ग्राह्य होईल. स्वतः काहीच करू न शकणाऱ्या पीटरचं हे बोलणं ऐकून रोर्क म्हणतो, तुला जर "क्लासिक" हवेच असतील, तर निदान चांगल्या क्लासिक्सची चोरी कर!
रोर्ककडून परत येत असताना पीटरचा आत्मविश्वास परत मूळपदावर आलेला असतो. पण आत कुठेतरी त्याला रोर्कचा दुःस्वास जाणवत राहतो. आपण स्वतः भीक मागितल्याची लाज न वाटता, रोर्कसारख्याने ती आपल्याला दिली, ह्याची त्याला खंत असते.
रोर्कच्या आराखड्यावर ग्रीक पद्धतीचं सारवण करून पीटर तो आराखडा फ्रँकनला दाखवतो. ते पाहून फ्रँकन जरा अचंबित होतो, ते नाविन्य पाहून त्याला धक्का बसतो... पण म्हणतो... "पीटर हा आराखडा तसा धाडसीच आहे, पण खरं तर मीही तुला हेच सुचवणार होतो.... माझ्याही मनात हेच होतं". ते ऐकून पीटरला ही आपला साहेबही आपल्याच पठडीतला, सेकंड हँडर आहे हे जाणवतं, आणि तो मनोमन सुखावतो.
एकदा चोरी केलेली पचते आहे म्हटल्यावर पीटरची वाटचाल त्याच मार्गावर निर्वेधपणे चालू राहते, आणि अशीच तीन वर्षं उलटतात.
ह्या तीन वर्षांत रोर्कमात्र हेन्रीच्या बरोबर काम (जे काही तुटपुंजं काम त्यांना मिळतं ते) करत असतो. आपल्यातील अंगभूत गुणांना पाणी चढवण्याचं काम हेन्रीच्या देखरेखीखाली करत असतो.
अशातच "सर्मन्स इन स्टोन्स" हे एक स्थापत्यशास्त्राच्या शतकानुशतकांच्या इतिहासाचा आढावा घेणारं पुस्तक प्रसिद्ध झालं जानेवारीमध्ये... स्थापत्यशास्त्राला त्याच्या मानवी संस्कृतीच्या उच्च स्थानावरून ओढून सर्वसामान्यांना कळेल अशा साध्या शब्दांत त्या प्रवासाचा आढावा घेणाऱ्या पुस्तकाचं प्रचंड स्वागत झालं. आणि त्या पुस्तकाच्या लेखकाचं नाव असतं "एल्सवर्थ माँक्टन टूही".....
क्रमशः...