नमस्कार,
आता वसंत सुरू झाला आहे, त्या निमित्ताने या चार ओळी लिहाव्या असं वाटलं.
खरं तर वसंताच्या आगमनाची चाहूल लागते ती माघातच! चैत्र, वैशाख हे वसंताचे महिने मानले जात असले तरी माघातल्या संक्रांतीनंतरच्या पंचमीपासूनच वसंताला सुरवात होते. पूर्वीच्या काळी माघ मासातील या वसंतपंचमी पासून वसंतोत्सवाला सुरुवात व्हायची. संक्रांतीनंतर सूर्याचं उत्तरगोलार्धात संक्रमण झाल्यानंतर हवेतली थंडी कमी होऊन वातावरण ऊबदार व्हायला लागतं, झाडांना नवी पालवी फुटू लागते, तसेच थंडीने जडावलेल्या शरीरात आणि मनातही चैतन्याचे अंकुर फुटू लागतात. या उल्हसित झालेल्या चित्तवृत्तींचे उत्सवात रुपांतर न झाले तरच नवल!
थंडीचा काळ संपता संपता रब्बी हंगामाचे पीक यायला लागते. वर्षाच्या दुसऱ्या सुगीचे दिवस सुरू होतात. धनधान्याने शिवारं डोलू लागतात. समृद्धतेचं तेज चेहऱ्यावरही पसरतं आणि सुरू होतो आनंदोत्सव - वसंतोत्सव! पूर्वीच्या काळी राजे आपल्या सर्व प्रजेनिशी व ऐश्वर्यानिशी या वसंतोत्सवात सामील होत असत. राजे, सरदार, सामान्य नागरिक, गरीब, श्रीमंत, सारेच एकत्र येत. एकात्मतेचं खरंखुरं प्रतीक म्हणजे हा उत्सव. रक्तकेशरी वसंताच्या स्वागतासाठी लोकंही लाल, केशरी, पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून रंगांची, फुलांची उधळण करीत असत. वसंताचा चेहरा आरक्तच! बघा ना, या ऋतूत फुलणारी पांगारा, शंकासुर, सीतेचा अशोक, काटेसावरी, ही सगळी झाडं लाल फुलांनी नटलेली असतात. म्हणूनच त्यांना जंगलातल्या ज्वाला' (The falmes of forest) असं संबोधलं जातं! वातावरणातली उष्णता जणू ही फुलं स्वतःच्या अंगावरच धारण करतात. या ऋतूत वातावरण उष्ण असलं तरी ग्रीष्मासारखा हा भाजून काढत नाही, उलट प्रेमिकांच्या हृदयात प्रेमाची ज्योत जागवतो. ऋतुसंहारात कालिदासाने वसंतऋतूचं इतकं चित्रमय वर्णन केलंय-
द्रुमाः सपुष्पाः सलिलं सपद्मं
स्त्रियः सकामाः पवनाः सुगन्धयः
सुखाः प्रदोषाः दिवसाश्च रम्याः
सर्वं प्रिये चारूतरं वसन्ते I
(झाडं फुलांनी डवरलेली, सरोवरं कमळांनी फुललेली, वारे सुगंध ल्यालेले, संध्याकाळ सुखाने भरलेली, दिवस रम्य, ह्या वसंतात सारं कसं सुंदर आणि स्त्रियासुद्धा सुंदर आणि कामोत्कंठीत!)
कालिदासाने स्त्रियांसाठी खास सकामाः हे विशेषण वापरलं आहे. वसंतात प्रेमभावना, कामभावना द्विगुणित होतात. (वसंते द्विगुणः कामः)
हा काळ कालिदासाने चितारल्याप्रमाणे खरोखरंच प्रणयकाळ!
(क्रमशः)
-सौ धनश्री लेले.