इतक्या सुंदर तरल भावनांना शब्दात कसं बांधशील?सारच कल्पनातीत!तुझ्या शब्दांच्या जादूने तु मला परत आपल्या जीवनातल्या नाजुक वळणावर घेऊन आलास आणि आपण दोघांनीहि हे उत्कट प्रेम अनुभवलं. मला तर हे वरदानच मिळाल होतं पण ही दुनिया तुझ्यासाठी खरंच अनपेक्षित होती.वयाच्या कोवळेपणात जे घडावं ते आता घडत होतं आणि या अकल्पित सत्यानं तु रंगुन गेला होतास.एक अजबशी दुनिया तु मला नजराणा म्हणुन बहाल केलीस आणि हातातुन निसटुन गेलेले हे सारे क्षण तु मला परत केलेस.एखाद्या भावविभोर मोरागत सारे इन्द्रधनुषी रंग तु उधळत होतास माझ्यावर.........
आणि मग सुरु झाला तो एक चैतन्यमयी प्रवास...तुझं ते बेभान होणं मला धास्तावुन गेलं.आयुष्याच्या या वळणावरची ही तुझी ओढ मला वेड लावुन गेली आणि तु रंगवत असलेल्या चित्रात मी मनमुराद रंगत गेले. तु तर इन्द्रधनुष्यच ओढुन घेतले होतेस आपल्या अंगावर नी माझ्यावर रंगांची उधळण करीत होतास आणि अचानक तुझी तन्द्री भंग झाली. हे सत्य आहे की स्वप्न तुझे तुलाच कळेना अन मग ती अगतिकता,ती खिन्नता,काळ्या ढगांसारखी आपल्यावर व्यापुन राहिलि. शीतल जलधारांच्या आशेने फ़ुलविलेल्या तुझ्या रंगीबेरंगी पिसाऱ्यातले सारे रंग तर माझ्याभोवती फ़ेर धरुन नाचत होते.त्यातुन मी भोवऱ्यासारखी आत आत अडकत गेले आणि वरुन तु मला हाकारत होतास जमिनीवर येण्यासाठी अन तुझ्या हाकेतली ती आर्तता माझ्या डोळ्यांतून बरसू लागली........(क्रमशः)